औरंगाबाद : 14 वर्षीय भोळसर मुलाचा राहत्या घरावरील दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास मयुरपार्क येथील मारोतीनगर मध्ये घडली . या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . शैलेश कैलास सोनवणे (वय 14) असे मृत मुलाचे नाव आहे .
पोलीस आणि नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शैलेशचे वडील हे माजी सैनिक असून ते मयूर पार्क येथे राहतात. शैलेश हा स्वभावाने भोळसर आहे. यासाठी त्याच्यावर सैनिकी रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. आज सकाळी शैलेशने आई वडिलांसोबत दुस-या मजल्यावर बसून चहा घेतला. त्यानंतर आई वडील दोघेही आपापल्या कामात व्यग्र झाले. काही वेळाने अचानक काहीतरी खाली कोसळण्याचा आवाज झाला. आवाज ऐकून आई- वडील दोघेही गॅलरीत आले असता शुभम रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला दिसला.
सोनवणे यांनी लागलीच शैलेश याला शेजाऱ्यांच्या मदतीने घराजवळील खाजगी रुग्णालयात हलविले. तो गंभीर जखमी असल्याने त्यास त्याला घाटी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहचण्या आधीच शैलेशची प्राणज्योत मालवली. वैधकीय अधिकाऱ्यांनी त्यांला तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर हे करीत आहेत.