औरंगाबाद : मराठवाड्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात ७५१ चारा छावण्या सुरू झाल्या. १ ते ३१ मेपर्यंत चारा छावण्यांवर १४२ कोटींचा खर्च होणे अपेक्षित धरून अनुदान मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. १,१४८ छावण्यांना शासनाने मंजुरी दिली आहे. सर्व छावण्यांमध्ये ४ लाख ८५ हजार ११९ मोठी जनावरे तर ४४ हजार ९५२ लहान जनावरे आहेत.जनावरांच्या तुलनेत फक्त ९ टक्के जनावरे छावण्यांमध्ये आहेत.
तसेच जूनअखेरपर्यंत १५७ कोटींचा टंचाई कृती आराखडा विभागीय प्रशासनाने तयार करून शासनाकडे सादर केला असून, त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जानेवारी ते जूनपर्यंत दोन टप्प्यांत आराखडा तयार करण्यात आला होता. एप्रिल ते जूनअखेरपर्यंत विभागातील संभाव्य पाणीटंचाई व उपाययोजनांसाठी १५७ कोटींच्या आसपास रक्कम लागेल असे गृहीत धरले होते. विंधन विहिरी, कू पनलिका, प्रादेशिक नळ योजनांची दुरुस्ती, विशेष दुरुस्ती मोहीम, पूरक नळयोजना, टँकर पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण, गाळ काढणे, बुडक्या घेण्यासारख्या योजनांचा कृती आराखड्यात समावेश होता.
गाळ काढण्यासाठी १ कोटी १० लाख, विहिरींच्या अधिग्रहणासाठी ४८ कोटींच्या आसपास खर्च प्रशासनाने गृहीत धरला होता. तात्पुरत्या पूरक नळ योजनांवर अंदाजे दीड कोटी रुपये इतकी रक्कम लागेल. विंधन विहिरींच्या दुरुस्तीसाठी २२ लाख तर प्रादेशिक नळ योजनांची विशेष दुरुस्तीसाठी २ कोटींचा खर्च प्रशासनाने गृहीत धरला आहे. विंधन विहिरी आणि कूपनलिकांसाठी सव्वादोन कोटींच्या आसपास खर्च लागणार आहे.
टँकर खर्चाची उड्डाणे कोटींच्या घरात जूनअखेरपर्यंत टँकरच्या पाणीपुरवठ्यावर सुमारे ११० कोटींच्या आसपास खर्च होण्याची शक्यता आहे. ३१ मार्च २०१९ पर्यंत ९४ कोटींच्या आसपास खर्चाचा आराखडा सादर करण्यात आला आहे. यामध्ये योजनांसह गाव आणि वाड्यांचा खर्च अपेक्षित आहे. मराठवाड्यातील सर्व ८७२ प्रकल्पांत १.७२ टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. ३ हजार ३८६ टँकरने ५५ लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर अद्याप कमी झालेले नाही.