लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये कॉपी करताना पकडलेल्या १४५५ विद्यार्थ्यांचा त्या सत्राचा ‘होल परफॉर्मन्स’ रद्द करण्याची शिफारस परीक्षा विभागाने केली. यात बी. एस्सी.च्या सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षेत गैरमार्गाचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्याला सहानुभूती न देता या प्रकाराला आळा घालण्यासाठीच कडक पवित्रा स्वीकारल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेश रगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.विद्यापीठाने मार्च ते मे महिन्यात घेतलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथकांनी जोरदार प्रयत्न केले. या मोहिमेत भरारी पथकांनी हजारो विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहाथ पकडले होते. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आणि कॉपी (नकला) जप्त करण्यात आल्या होत्या. परीक्षा मंडळाने नियुक्त केलेल्या समितीने त्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. आतापर्यंत या समितीने विविध अभ्यासक्रमांच्या १४५५ विद्यार्थ्यांचे पूर्ण सत्राचे निकाल ‘होल परफॉर्मन्स कॅन्सल’ (डब्ल्यू.पी.सी.) रद्द करण्याची कडक कारवाईची शिफारस कुलगुरूंकडे केली आहे. कुलगुरूंनी मान्यता देताच प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येईल, असे डॉ. राजेश रगडे यांनी सांगितले.हजारो प्रकरणे समितीसमोर या समितीने आतापर्यंत १४५५ विद्यार्थ्यांवर डब्ल्यू.पी.सी. कारवाई केली. कॉपी करताना पकडलेल्या आणखी हजारो विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय या समितीसमोर प्रस्तावित आहे. यात अभियांत्रिकी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यामुळे डब्ल्यू.पी.सी.ची कारवाई करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा चार हजारांपेक्षा अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या अभ्यासक्रमांच्याविद्यार्थ्यांवर कारवाईविद्यापीठाच्या परीक्षा विभागाने बी. एस्सी. सर्व सत्रांच्या मिळूण ६५७ विद्यार्थी, बी. ए. - ५५७, बी. कॉम. - २२०, एम. कॉम.- २१, एलएल. बी. - १७ आणि एम.पी.ई.डी.च्या ३ विद्यार्थ्यांचा निकाल रद्द करण्याची कारवाई केली, असेही डॉ. राजेश रगडे यांनी सांगितले. कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर कारवाईचे प्रस्ताव विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध मूल्यांकन केंद्रांहून परीक्षा विभागाकडे येत आहेत. हे प्रस्ताव समितीसमोर ठेवले जातात. समिती डब्ल्यू. पी. सी. करण्याची शिफारस कुलगुरूंकडे करते, असे डॉ. रगडे म्हणाले.
१४५५‘कॉपी’बहाद्दरांचा ‘होल परफॉर्मन्स’ रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:10 AM