नांदेड : जिल्ह्यात विशेष समाजकल्याण कार्यालयामार्फत एकूण १५ वसतिगृह सुरु असून यापैकी ७ भाड्याच्या इमारतीत चालतात. विद्यार्थी मान्य संख्या असतांना जागेअभावी १४७ विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत.जिल्ह्यात नांदेड-२, बिलोली, धर्माबाद, नायगाव, भोकर, उमरी, अर्धापूर व हदगाव आदी ठिकाणी ९ वसतिगृह चालतात. तर ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सोयीचे व्हावे, यासाठी गतवर्षी जिल्ह्यातील नांदेड, मुखेड, देगलूर, भोकर, हदगांव व उमरी या तालुक्याच्या ठिकाणी ६ नवीन वसतिगृह सुरु करण्यात आली आहेत. यापैकी बऱ्याच वसतिगृहात प्रवेशक्षमतेपेक्षा कमी खोल्या असल्याने प्रशासकीय कारण दाखवित विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.शासनाने वसितगृहास विद्यार्थी प्रवेश क्षमता ठरवून दिली असून प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची तरतुद केलेली आहे. मात्र काही वसतिगृहात इमारतक्षमतेचा विचार करुन प्रवेशच दिला नसल्याने गरीब विद्यार्थ्यांना खोली भाड्याने घ्यावी लागल्याने आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. विशेष समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती जमातीच्या मागास विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देता यावे, यासाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते. मात्र जिल्ह्यातील बहुतांस वसतिगृहांना स्वत:ची इमारत नसल्याने तसेच उपलब्ध जागा अपुरी असल्याने गरजूवंत विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत.शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाची भाड्याची इमारत बऱ्यापैकी असली तरी शहरातीलच गुणवंत मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीची दुर्दशा झाली आहे. या वसतिगृहाला कायमस्वरुपी गृहपाल नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय बिलोली, धर्माबाद, अर्धापूर येथील मुलांच्या तर मुखेड, देगलूर, भोकर, हदगांव व उमरी येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मुलींच्या वसतिगृहानांही कायमस्वरुपी गृहपाल नाही. (प्रतिनिधी)एकूण १५ वसतिगृहात १४८५ विद्यार्थी मान्यसंख्या आहे. इमारत क्षमता १४७७ असल्याची समाजकल्याण कार्यालयाकडे नोंद आहे. परंतु १३३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असून १४७ विद्यार्थ्यांच्या जागा अद्यापही रिक्त आहेत. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांत शालेय विद्यार्थी ५००, महाविद्यालयीन ७८८, दारिद्र्य रेषेखालील ४२ विद्यार्थ्यांचे खास बाब प्रवेश आहेत.
समाजकल्याणच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या १४७ जागा रिक्त
By admin | Published: July 30, 2014 12:57 AM