औरंगाबाद : नान किंवा पराठा हा पदार्थ आता मराठवाड्यातील लोकांना चिरपरिचित आहे. हा पाहुणा म्हणून आलेला पदार्थ इथलाच वाटावा, इतपत मराठवाडी जनतेने हा पदार्थ स्वीकारला. चौदाव्या शतकात जेव्हा मोहम्मद तुघलकाने देवगिरीवर आक्रमण केले, तेव्हा या पदार्थाची मराठवाड्याला ओळख झाली. या पदार्थाचा रंजक प्रवास ज्येष्ठ इतिहास अभ्यासक रफत कु रेशी आणि दुलारी कुरेशी यांनी सांगितला.
याविषयी सविस्तरपणे सांगताना ते म्हणाले की, चौदाव्या शतकात मोहम्मद तुघलक हा देवगिरी प्रांत जिंकण्यासाठी या भागात आला. तेव्हा त्याच्यासोबत त्याचे अफाट सैन्य होते. एवढ्या मोठ्या सैन्याची भूक भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अन्नपुरवठा आवश्यक होता. तव्यावर पोळ्या करून हजारो सैन्याची भूक भागविणे अवघड होते.
त्यामुळे त्यावर उपाय म्हणून मैदा, तेल, रवा, मीठ हे पदार्थ एकत्रित करण्यात आले. जमिनीत एक मोठा खड्डा करून भट्टी पेटविण्यात आली. भट्टी तापली की नान किंवा पराठे बनवून यात थापले जायचे. या भट्टीमुळे एकाच वेळी शंभरपेक्षा अधिक नान किंवा पराठे बनविणे शक्य व्हायचे. आता याच भट्टीला आपण तंदूर भट्टी म्हणून ओळखतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या सैन्याची भूक भागविण्याच्या गरजेपोटी या पदार्थाची निर्मिती झाली आणि मोहम्मद तुघलकासोबत हा पदार्थ मराठवाड्यात दाखल झाला.
सध्या नान किंवा पराठ्याचे अनेक प्रकार उपलब्ध असून, पुरीपासून ते अगदी परातीपर्यंतच्या आकाराचे पराठे बनविण्यात येतात. वेगवेगळ्या भाज्यांसोबत अथवा हलव्यासोबत या पदार्थाची गोडी चाखता येते.
ईदला शिरखुर्माच का?मुस्लिम बांधव एक महिना रोजे ठेवतात आणि त्याचा आनंद ईदच्या दिवशी शिरखुर्मा करून साजरा करतात. या दिवशी शिरखुर्माच का, हे सांगताना रफत कुरेशी म्हणाले की, पूर्वी खजूर हे सौदी अरेबियाचे मुख्य पीक होते. तेथे ते मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे सगळ्यांना ते घेणे शक्य व्हायचे. यामुळेच दूध म्हणजेच शिर आणि खुर्मा म्हणजेच खजूर या दोघांच्या मिश्रणातून शिरखुर्मा तयार झाला. काळानुसार आवड आणि खाद्यसंस्कृतीत झालेल्या बदलामुळे आता शिरखुर्मामध्ये सुकामेवा, शेवया हे पदार्थही आवडीनुसार समाविष्ट केले जातात; पण मूळ शिरखुर्मा म्हणजे खजूर आणि दूध यांचेच मिश्रण होय.