छत्रपती संभाजीनगर : निलंबन झाल्यानंतरही लाच स्वीकारण्यासाठी कार्यालयात थांबलेला सहदुय्यम निबंधक छगन पाटील याला एसीबीने शुक्रवारी अटक केली. ५ हजारांची लाच स्वीकारताना त्याला दालनात रंगेहाथ पकडले. हा सापळा फत्ते होताच त्याच्या घरात दुसऱ्या पथकाने ५ मिनिटांत प्रवेश केला. १० ते २० लाख सापडतील, या अंदाजाने गेलेल्या पथकाला तेथे नोटा मोजण्याची मशीन आणावी लागली. दहा तासांच्या झाडाझडतीत १ कोटी ३६ लाख ७७ हजार रोख, २८ तोळे सोने, १८ स्थावर मालमत्तांसह मोठे घबाड आढळले.
सिल्लोडमधील तक्रारदार व त्यांच्या भावजयीची धावडा शिवारात सामायिक जमीन होती. ती जमीन पत्नीच्या नावावर करण्यासाठी निबंधक कार्यालयात अर्ज केले. जवळपास ५० हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च करूनही पाटीलने पुन्हा स्टॅम्प व्हेंडर भीमराव खरातमार्फत त्यांना ५ हजार मागितले. संतापलेल्या तरुणाने एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. दुसऱ्या पथक घराकडे जात असताना बॅग घेऊन निघालेली पाटीलची मुलगी पकडली गेली. मोजणीत ४५ लाखांची रोख आढळली. त्यानंतर धान्याचे पोते, कळशी, कपड्यांच्या गाठोड्यांमध्येही नोटा आढळल्या.