औरंगाबाद : चुलीतील विस्तवाने झोपडी पेटल्याने त्यात बांधलेल्या १५ शेळ्या होरपळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री खुलताबाद तालुक्यातील नंद्राबाद येथे घडली.
नंद्राबाद येथील गट नंबर 23 मध्ये सुखलाल रखमाजी मोरे हे आपली आई नगुबाई रखमाजी मोरे यांच्यासोबत झोपडीत राहतात. सुखलाल हे शेळीपालन करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी रात्री झोपडीतील चुलीवर स्वंयपाक केल्यानंतर नगुबाई यांनी त्यातील लाकडे विझवली. रात्री सुखलाल यांनी शेळ्यांना झोपडीत बांधले व ते आईसोबत बाहेर झोपले.
मध्यरात्री अचानक चुलीतील विस्तवाने पेट घेतला. वारा असल्याने विस्तव उडून बाहेर आल्याने गवताची झोपडी काही क्षणातच संपूर्ण पेटली. आतील शेळ्यांच्या आवाजाने सुखलाल यांना जाग आली. त्यांनी शेळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत १५ शेळ्या होरपळून मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यांनी प्रयत्नपूर्वक जखमी 8 शेळ्यांना बाहेर काढले. यात ते सुद्धा भाजले गेले आहेत.
घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी विलास सोनवणे, तलाठी सचिन भिंगारे, पोहेकॉ संजय जगताप, गणेश लिपने यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. सरपंच सय्यद इलियास, उपसरपंच संतोष बोडखे, माजी सरपंच द्वारकादास घोडके, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सय्यद रफीक, ग्रा.पं. सदस्य राम निंभोरे यांनी भेट देऊन मोरे यांना शासकीय मदतीची मागणी केली.