औरंगाबाद/ वाळूज महानगर : दुष्काळामुळे औद्योगिक वसाहतींचा १५ तासांनी पाणीपुरवठा कपात करण्याची वेळ आली आहे. उद्योग व निवासी क्षेत्रातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एमआयडीसीने तयार केले आहे. यामुळे वाळूजसह शेंद्रा, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतींतील उद्योगांच्या उत्पादनाला फटका बसणार आहे. या निर्णयापूर्वी कुठे २४, तर कुठे १८ किंवा १३ तास उद्योगांना पाणीपुरवठा होत असे, आता ५ ते ३ तासच पाणीपुरवठा होणार आहे.
विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार एमआयडीसीने धरणातील उपलब्ध साठ्याचे नियोजन करून उद्योगांसह निवासी क्षेत्रातील पाणीपुरवठ्याची वेळ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योगांचे पाणी कमीत कमी कपात करण्यात येईल, असे सांगितले होते. वाळूज महानगरातील निवासी क्षेत्राला पहाटे ५ ते दुपारी १ व वाळूज औद्योगिक क्षेत्राला दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेत पाणीपुरवठा केला जाणार आहे. याचप्रमाणे चिकलठाणा औद्योगिक क्षेत्राला सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत फक्त ३ तास, शेंद्रा औद्योगिक क्षेत्राला पाणी उपलब्धतेनुसार ३ तास, औरंगाबाद औद्योगिक क्षेत्राला सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत, तर औरंगाबाद नागरी वसाहतीला सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, तसेच जालना औद्योगिक क्षेत्राला पाणी उपलब्धतेनुसार दररोज ३ तास पाणी दिले जाणार आहे.
एमआयडीसीकडून वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, जालना औद्योगिक वसाहतीला, तसेच वाळूज महानगरातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने जायकवाडीत पुरेसा जलसाठा होऊ शकला नाही. दुष्काळामुळे जिल्ह्यातील १२ लाख लोकसंख्येला पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरने पाणी द्यावे लागत आहे. एमआयडीसीच्या वाळूज, शेंद्रा येथील जलकुंभावरून ग्रामीण भागासह मनपाला टँकरने पाणी द्यावे लागत आहे. सध्या जायकवाडीतील मृतसाठ्यातून उद्योगासह निवासी क्षेत्राला पाणीपुरवठा होत आहे.
उद्योगांवर होणार परिणाम वाळूज औद्योगिक क्षेत्रात पाण्यावर अवलंबून असलेले ५ ते १० टक्के मद्य, बीअर, औषधी कंपन्या आहेत. तसेच अनेक कोटिंग उद्योगांना तापमान थंड करून ठेवण्यासाठी पाण्याची गरज असते. या उद्योगावर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ४अनेक गावांना लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पाणी मिळत असल्याने अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यातही एमआयडीसीने निवासी क्षेत्राच्या पाणीपुरवठा वेळेत कपात केली आहे. नागरी वसाहतीत आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार आहे.