औरंगाबाद : वामन हरी पेठे ज्वेलर्समधून ६५ किलो सोन्याची हेराफेरी प्रकरणात पोलिसांनी सोमवारी मुथूट फायनान्सकडून २५ किलो किलो सोने जप्त केले. मंगळवारी आयआयएफएल आणि मुथूट फायनान्सकडून १५ लाखांचे अर्धा किलो सोने आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केले. सोमवारी उशिरा अटक केलेल्या जडगाववाला ज्वेलर्सचे राजेंद्र मन्नालाल सेठिया यास मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
राजेंद्र जैन याने सुवर्णपेढीतून बाहेर नेलेले काही सोने विकून ४ ते ५ कोटी रुपये परत वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये जमा केले होते; परंतु या व्यवहारातून येणाऱ्या पैशातून त्याने स्वत:चा व्यापार चालविण्यावर भर दिला होता. जडगाववाला ज्वेलर्सही यात हात धुऊन घेत असल्याचे तपासात पुढे आले आहे. राजेंद्र सेठिया यास पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने २२ हजार रुपये तोळे दराने ३० किलो सोने विकत घेतल्याचे समोर आले. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सेठियाकडून आणखी सोने हस्तगत करायचे असल्याने त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती पोलिसांतर्फे करण्यात आली. न्यायालयाने त्याला दि.१२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली.
मंगळवारी अर्धा किलो सोने जप्तराजेंद्र जैन याने कोठडीत दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आयआयएफएफ आणि मुथूट फायनान्स कंपनीत ठेवलेले १५ लाख रुपये किमतीचे अर्धा किलो सोने जप्त केले. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक सोने जप्त करण्याठी गेले असता उपरोक्त संस्था टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आले. या पथकाने अखेर अर्धा किलो सोने दोन कंपन्यांकडून जप्त केले आहे.
भारती जैनचा शोध सुरूसोन्याच्या हेराफेरीत राजेंद्र जैनच्या पत्नीचाही हात असल्याचे उघड झाले असून, ती सध्या फरार झाली आहे. नातेवाईकांकडे पोलीस तिचा शोध घेत आहेत, असे निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले.