कन्नड (औरंगाबाद ) : शहरात महावितरणच्या भरारी पथकाने १५ वीजचोऱ्या पकडल्या आहेत. विज चोरीच्या दंडाची रक्कम १५ लाख ७३ हजार ४२० रुपये आहे.
औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण व जालना या तिन्ही भरारी पथकांनी शहरात तपासणी केली. यात शहरातील मोठे मंगल कार्यालय, वाईन शॉप, आईस्क्रीम पार्लर, मोठे घरगुती ग्राहक, पाणी फिल्टर प्लांट, अद्रक धुण्याची जागा आदी व्यापारी ठिकाणी मीटर तपासणीमध्ये वीज चोरी आढळून आली. यानंतर पथकाने विज चोरीचे निर्धारण करून १५ ग्राहकांना एकूण १५ लाख ७३ हजार ४२० रुपये दंड आकारण्यात आला आहे. या मोठ्या कारवाईमुळे कन्नड उपविभागातील ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.
या कारवाईस मुख्य अभियंता सुरेश गणेशकर ,अधीक्षक अभियंता संजय आकोडे, कन्नडचे कार्यकारी अभियंता अभिजीत सिकनीस यांचे मार्गदर्शन लाभले. उन्हाळ्यातील वाढता वीज वापर लक्षात घेता अशा प्रकारच्या कारवाया अधिक प्रमाणात राबविण्यात येणार आहेत अशी माहिती कन्नड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय दुसाने यांनी दिली.