गंगापूर : तालुक्यातील शिंगी येथे रविवारी रात्री ९ वाजता दूषित पाण्यामुळे १५ जणांना विषबाधा झाली असून त्यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.शिंगी येथील जाधव कुटुंब हे शेतवस्तीवर वास्तव्यास असून सध्या भीषण पाणीटंचाई असल्याने शेतकरी मिळेल त्या पाण्याचा वापर करून तहान भागवतात.रात्री ९ वाजता विषबाधेने अस्वस्थ झालेल्या रुग्णांना ग्रामस्थांनी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती चव्हाण, श्रद्धा गुडदे, अंजली गायकवाड यांनी तातडीने उपचार केले व घाटीकडे रवाना केले.विषबाधा झालेल्यांमध्ये बाळासाहेब जाधव, लक्ष्मण जाधव, तेजस फालके, किरण जाधव (३ महिने), अनिकेत जाधव, ओम जाधव (७), राम जाधव (६), गोकुळ जाधव (२२), सरला जाधव (३०), पूनम फालके (२२), कल्याणी जाधव (३), भागीरथी जाधव (५२), शशिकला नागरे (५०), लता जाधव (३०), झेलाबाई फालके (४०) आदींचा समावेश आहे.उपसा न झालेल्याविहिरीचे पाणी पिलेबाळू नाना जाधव यांच्या गट नंबर ३४ मध्ये स्वत:ची विहीर आहे. परंतु गेल्या सहा महिन्यापासून या विहिरीतील पाण्याच्या उपसा झालेला नव्हता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बाळू जाधव यांचे कुटुब हेच पाणी पित होते. तेव्हापासून या कुटुंबातील काही सदस्यांना चक्कर येणे, डोळ्याला अंधारी येणे, उलटी होणे असा त्रास जाणवत होता. रविवारी रात्री मात्र त्रास वाढल्याने सर्वांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
दूषित पाण्यामुळे गंगापूर तालुक्यात १५ जणांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:37 AM