छत्रपती संभाजीनगर : आधार कार्डच्या केंद्रासाठी महापालिकेची जागा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी एका विद्यार्थ्यांस १५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली. विद्यार्थ्याने लाच मागणारा महापालिकेचा लिपिक, कंत्राटी कनिष्ठ अभियंता यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) नोंदवली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने दोघांना १५ हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
निखिल मुकुंद गायकवाड (२९, पद : कनिष्ठ लिपीक, मालमत्ता विभाग), शेख मोईनुद्दीन शेख नईम (३०, पद : कनिष्ठ अभियंता कंत्राटी, मालमत्ता विभाग) अशी लाच मागणाऱ्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदार विद्यार्थी २६ वर्षांचा असून, तो शिक्षण घेत आधार केंद्र चालवतो. त्याला आधार केंद्रासाठी महापालिकेची शासकीय जागा तात्पुरत्या स्वरूपात जागा हवी होती. ही जागा देण्यासाठी गायकवाड याच्या आदेशाने शेख मोईनुद्दीन याने १५ हजार रुपये लाचेची मागणी २८ व ३१ मार्च रोजी दोन वेळा केली. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे विद्यार्थ्याने एसीबीकडे तक्रार नोंदवली. त्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पोलिस निरीक्षक दीपाली कदम यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी महापालिकेच्या परिसरात सापळा लावला.
लाचेची मागितलेली रक्कम गायकवाड याने शेख मोईनुद्दीन याच्या उपस्थितीत महापालिकेच्यासमोरील भागात स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांच्या विरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल तांबे, उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक दीपाली कदम, हवालदार दत्ता होरकटे, भिमराव जिवडे, सुनील पाटील, अशोक नागरगोजे, चंद्रकांत शिंदे, चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली.