औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत डिसेंबर ते जानेवारीदरम्यान, १५० एशियाड बस बांधणीचे नियोजन करण्यात आले आहे. या बस बांधणीसाठी चेसीस खरेदीचे आदेश देण्यात आले आहेत. बांधण्यात आलेल्या बस मराठवाडा आणि कोकण येथील महामंडळाच्या विभागास देण्यात येणार असल्याची माहिती कार्यशाळेच्या अधिकाऱ्यांनी दिली.या एशियाड बस अशोक लेलॅण्ड चेसीसवर बांधण्यात येणार आहेत. पहिल्यांदाच या चेसीसवर एशियाड बसची बांधणी केली जाणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिकाधिक आरामदायी व्हावा, यासाठी आसन व्यवस्थेत आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. बस अधिकाधिक आकर्षक आणि आरामदायी होतील, यादृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय काही एशियाड बसच्या सीट या शिवनेरी बसप्रमाणे बनविण्याचे नियोजन केले जात असून, त्यासाठी डिझाईन तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे आगामी कालावधीत प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे, असे चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेचे व्यवस्थापक जयवंत चव्हाण म्हणाले.१८ नवीन बसची बांधणीचिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत गेल्या दहा महिन्यांपासून ‘चेसीस’चा पुरवठा न झाल्याने नवीन बसची निर्मिती बंद होती; परंतु कार्यशाळेस नवीन ‘चेसीस’चा पुरवठा सुरू झाला असून,जवळपास आतापर्यंत ४० चेसीस दाखल झाल्या आहेत. यामध्ये सोमवारपर्यंत कार्यशाळेत १८ परिवर्तन बसची बांधणी झाली आहे.कार्यशाळेत नुकत्याच तयार झालेल्या नव्या परिवर्तन बस दसऱ्यानिमित्त तुळजापूर यात्रेसाठी रवाना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नवीन बस बांधणीमुळे दिवाळीत विविध मार्गांसाठी नवीन बस देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.तामिळनाडूत गेल्या दोन दिवसांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कार्यशाळेसाठी रवाना झालेल्या काही चेसीस तामिळनाडूत थांबविण्यात आल्या आहेत.
मराठवाडा व कोकणसाठी होणार १५० एशियाड बसची बांधणी
By admin | Published: September 30, 2014 1:09 AM