औरंगाबाद : शहरातील ५२ रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १५० कोटी रुपयांच्या निविदा पुन्हा नव्याने प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. शासनाने लागू केलेल्या नवीन एसएसआर दरानुसार निविदा प्रसिद्ध होतील. निविदांच्या अंदाजपत्रकांमध्ये काही रक्कम कमी किंवा जास्तही होऊ शकते, अशी माहिती सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. दहा दिवसांसाठी या निविदा प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर वर्क आॅर्डर दिली जाईल. जून महिन्यात ही कामे सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी जून महिन्यात १०० कोटी रुपये महापालिकेला रस्ते गुळगुळीत करण्यासाठी दिले. या निधीतून कोणते रस्ते करावेत यावरून सर्व राजकीय पक्षांमध्ये जुंपली. नंतर ही कामे मिळविण्यासाठी कंत्राटदारांमध्ये टोकाचे वाद निर्माण झाले. कंत्राटदारांचा वाद थेट न्यायालयापर्यंत पोहोचला. मागील आठवड्यात वादी आणि प्रतिवादी कंत्राटदारांनी न्यायालयात समेट करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने न्यायालयात अर्जही करण्यात आला आहे. न्यायालयातील वाद संपल्यावर लवकरच मनपा शासनाच्या नवीन एसएसआर दरानुसार अंदाजपत्रक तयार करणार आहे. या दरानुसार मनपाला १५ ते १८ कोटी रुपयांचा फायदा होईल.
पूर्वी डीएसआर दरानुसार अंदाजपत्रक तयार केले होते. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या आदेशानुसार लवकरच नवीन निविदा प्रसिद्ध होतील. एकूण ६ निविदा प्रसिद्ध होणार असल्याची माहिती घोडेले यांनी दिली. शासनाच्या १०० कोटींशिवाय ५० कोटी रुपये मनपाचे आहेत. या पन्नास कोटीत डिफर पेमेंट पद्धतीवर रस्त्याची कामे करण्यात येणार आहेत. शासन निधीतील कामे मिळविणाऱ्या कंत्राटदारांनाच डिफर पेमेंटवरील कामे करावी लागणार आहेत.