छत्रपती संभाजीनगर : गुगलवरील हॉटेलच्या रिव्ह्यूव्हसाठी १५० रुपये देऊन सायबर गुन्हेगारांनी सुशिक्षित तरुणीचे अवघ्या ४८ तासांत ८ लाख ५६ हजार रुपये लंपास केले. उत्तर प्रदेश व पंजाबच्या बँक खात्यात ही रक्कम वळती झाली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात पैसे गेलेल्या सहा बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
तीस वर्षीय सुशिक्षित ३० वर्षीय तरुणी नामांकित खासगी समूहात प्रशासकीय अधिकारी आहे. ५ जुलैला दुपारी बारा वाजता कार्यालयात असताना त्यांना व्हॉट्स ॲपवर गुगल रिव्ह्यूव्ह फॉर हॉटेल कसे करायचे माहीत आहे का, अशी लिंक आली. त्यावर क्लिक केल्यावर त्यांना प्रत्येक रिव्ह्यूव्हसाठी १५० रुपये मिळतील, अशी जाहिरात दिसली. तरुणीने त्यावर विश्वास ठेवत एक रिव्ह्यूव्ह करून संबंधित संकेतस्थळावर अपलोड केला. त्यानंतर तत्काळ त्यांना संपर्क करण्यात आला. टेलिग्रामवर लिंक पाठवून माहिती देण्यास सांगितले. मात्र, तेथे सायबर गुन्हेगाराने त्यांना अचानक १५ हजारांचे २१ हजार करून देण्याचा टास्क दिला. तो टास्क पूर्ण झाल्यावर गुन्हेगारांनी आता ३२ हजार रुपये पाठवा, तरच आधीचे पैसे व नफा मिळेल, असे सांगितले. तरुणीने तेही पैसे पाठविले. त्यानंतर दुसऱ्याने कॉल करून तुम्ही आधी केलेले टास्क चुकीचा आहे, असे सांगून आणखी पैसे मागितले. सायबर गुन्हेगार विविध कारणाखाली पैसे मागत गेले व तरुणी त्यांना पैसे देत गेली.
तब्बल १२ खात्यांवर पैसे गेलेतरुणीला १५० रुपयांच्या आमिषाखाली सायबर गुन्हेगारांनी तब्बल टेलिग्राम व एका लिंकच्या माध्यमातून ८ लाख ५६ हजार रुपये उकळले. हे पैसे उत्तरप्रदेश व पंजाबच्या आयसीआयसीआय व पंजाब नॅशनल बँकेच्या एकूण बारा शाखांमध्ये वळते झाले. यातील सर्व खाते हे राईस ट्रेडर्स, एमब्रॉयडरी क्रिएशन, जय दानी हार्डवेअर, यादव मॅन पॉवर सप्लायर यांच्या खात्यावर गेले. जवाहरनगरचे पोलिस निरीक्षक व्यकंटेश केंद्रे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.