उमरी (नांदेड): विहिरीच्या बांधकामासाठी शासकीय अनुदानाचा दुसरा हप्ता देण्यासाठी एक हजार पाचशे रुपयाची लाच स्वीकारताना मनरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विना सुर्यवंशीस लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात पकडले. ही घटना २४ मार्च रोजी दुपारी उमरी पंचायत समितीच्या कार्यालयात घडली.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, तक्रारदारास महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा (मनरेगा) अंतर्गत शेतविहीर मंजूर झाली होती. सदर विहिरीचे काम पूर्ण झाले. शासकीय अनुदानाचा पहिला हप्ता तक्रारदारास मिळाला. विहिरीचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण केले .यानंतर या विहिरीचा शासकीय अनुदानाचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी फाईल पंचायत समिती उमरी येथे दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, अनुदानाचा दुसरा हप्ता मंजूर करण्यासाठी लोकसेवक वीणा सूर्यवंशीने पंधराशे रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे संपर्क साधला. त्यानंतर आज दुपारी पंचायत समिती कार्यालयात लाचेचे पंधराशे रुपये स्वीकारताना सहाय्यक कार्यक्रमाधिकारी वीणा सूर्यवंशी यांना लाचलुचपत खात्याच्या पथकाने रंगेहात पकडले.
ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अशोक ईप्पर, सपोउपनि संतोष शेटे, पोलीस जमादार मेनका पवार, पोलीस नायक राजेश राठोड, मारुती सोनटक्के आदींनी केली. सदर प्रकरणी उमरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.