औरंगाबाद : राज्य महामार्ग, जिल्हा अंतर्गत रस्त्यांसाठी १५ हजार कोटी उभारणार असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी सांगितले. राज्यात चाळीस हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. अनेक रस्त्यांची कामे रखडली आहेत यास संबंधित कंत्राटदार जबाबदार असल्याचे चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
विभागातील वार्षिक नियोजन प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली. यात प्रथम नांदेड जिल्ह्याचा आढावा पवार यांनी घेतला. या बैठकीनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, मागील काळातील भाजपच्या सरकाने मराठवाड्यातील रस्त्यांसाठी फारसा निधी दिला नाही, ही वस्तुस्थिती आहे. दरवर्षी १०-१२ हजार कोटी रुपये निधी मंजूर केला जातो. मात्र एवढ्या निधीत रस्त्यांची कामे होत नाहीत.
त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने या वेळी १५ हजार कोटी रुपये उभारण्याची तयारी केली आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सहकार्याने राज्यातील रस्त्यांना अधिकच पैसा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चव्हाण म्हणाले. रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी विरोधात तक्रारी आहेत यावर मी गडकरी यांच्या मताशी सहमत आहे, मात्र यावर कारवाई व्हायला हवी, आमच्या अधिकारात असेल ते आम्ही कारवाई करू, तुमच्या अखत्यारीत असेल ती कारवाई तुम्ही करा. असे ते म्हणाले.