औरंगाबाद : जिल्ह्याला गुरुवारी मध्यरात्री ४५ हजार लसीचे डोस शासनाकडून उपलब्ध झाले. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार शहरासाठी महापालिकेला फक्त १५ हजार डोस देण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी ३९ केंद्रांवर नागरिकांना लस देण्यात आली. ११ हजार ८०० जणांनी लस घेतली. मनपाकडे आता ३ हजार २०० डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे शनिवारी मोजक्याच ७ केंद्रांवर लसीकरण ठेवण्यात आले.
शहरात १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. आठ दिवसांपासून शासनाकडून लसींचे अत्यल्प डोस दिले जात असल्यामुळे महापालिकेला अधून-मधून मोहीम बंद ठेवावी लागत आहे. चार दिवस मोहीम बंद ठेवल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री मनपाला १५ हजार डोस मिळाले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोजक्याच ३९ केंद्रांवर शुक्रवारी लसीकरण मोहीम ठेवली. दिवसभरात ११ हजार ८०० नागरिकांनी रांगा लावून डोस घेतले. काही केंद्रांवर तर मनपाला टोकन पद्धतीचा अवलंब करावा लागला. विशेष बाब म्हणजे ३ हजार ५०० नागरिकांनी दुसरा डोस घेतला. मनपाकडे आता फक्त ३ हजार २०० लसीचा साठा उपलब्ध आहे. शनिवारी शहरातील ७ आरोग्य केंद्रांवरच लसीकरण ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे.
या केंद्रांवर मिळणार लस
सिडको एन-८ मनपा रुग्णालय, एन- ११ मनपा रुग्णालय, जवाहर कॉलनी आरोग्य केंद्र, पंडित दीनदयाल उपाध्याय आरोग्य केंद्र-पुंडलिकनगर, नक्षत्रवाडी आरोग्य केंद्र, बन्सीलालनगर आरोग्य केंद्रावर कोविशिल्डचा पहिला, दुसरा डोस मिळेल. त्याचप्रमाणे कोव्हॅक्सिन एमआयटी रुग्णालय, एन-४, क्रांतीचौक आरोग्य केंद्र, राजनगर आरोग्य केंद्रावर पहिला, दुसरा डोस उपलब्ध राहील.