छत्रपती संभाजीनगर : एका हातात शंख, दुसऱ्या हातात सुदर्शन चक्र, तिसऱ्या हातात गदा, तर चौथ्या हातात कमळ होय. या वर्णनावरून तुमच्या लक्षात आले असेल की, विश्वाचे पालन करता भगवान विष्णू आहेत. अशा भगवंतांचा निवास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आहे. हे माहीत आहे का तुम्हाला? हो भगवान विष्णूंच्या मूर्ती विद्यापीठात आहे. येथील ऐतिहासिक सोनेरी महल व हिस्ट्री म्युझियममध्ये मिळून तब्बल १६ पेक्षा अधिक प्राचीन मूर्ती विराजमान आहेत. यातील बहुतांश मूर्ती या ११ व्या ते १३ व्या शतकादरम्यानच्या आहेत.
अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास या काळात भगवान विष्णू (पुरुषोत्तम) यांची आराधना केली जाते. देशातील पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर माजलगाव तालुक्यात लाखो भाविक दर्शनासाठी जात आहेत. आपल्या शहरातही तीन मंदिर आहेत, जिथे भगवान विष्णू व लक्ष्मीच्या मूर्ती आहेत. याशिवाय डाॅ. बा. आं. म. विद्यापीठात ऐतिहासिक सोनेरी महलात संग्रहालयात व हिस्ट्री म्युझियममध्ये भगवान विष्णूच्या विविध अवतारांतील मूर्ती आपणास पाहण्यास मिळतात. विशेष म्हणजे मराठवाड्यात केलेल्या खोदकामात सापडलेल्या या प्राचीन मूर्तीचे जतन येथे करण्यात आले आहे.
सोनेरी महलात विष्णू केशवराजअहमदनगर जिल्ह्यातील वरखेड या गावात उत्खननात सापडलेली ११ व्या, १२ व्या शतकातील ‘विष्णू केशवराज’ ही मूर्ती सोनेरी महलात ठेवण्यात आली आहे. काळ्या पाषाणातील मूर्तीवर उत्कृष्ट नक्षीकाम केले आहे. सुमारे चार फुटाचीही येथील मूर्ती आहे. याशिवाय प्रवरासंगम येथे सापडलेली लक्ष्मीनारायण मूर्ती, गंगापूर येथून आणलेली विष्णू-गोविंद अवतार, माधव अवतार, वामन अवतार या मूर्ती व त्यावरील शिल्पकला बघण्यासारखी आहे. पैठण येथे १९ व्या शतकातील संगमरवरीमधील लक्ष्मी नारायण मूर्तीही लक्ष वेधून घेते. तसेच भगवान विष्णूच्या काही पंचधातूच्या मूर्तीही येथे आहेत.
हिस्ट्री म्युझियममधील शेषनागावरील लक्ष्मीनारायणविद्यापीठातील हिस्ट्री म्युझियममध्ये एकाच दगडात कोरलेली शेषनागावर विराजमान असे भगवान विष्णू व लक्ष्मी देवीची मूर्ती लक्ष वेधून घेते. बीड जिल्ह्यातील गोळेगाव येथीलही मूर्ती आहे. उस्मानाबाद व अन्य जिल्ह्यांत मिळालेल्या ११ ते १२ व्या शतकातील भगवान विष्णूच्या पाच मूर्ती येथे बघण्यास मिळतात.
एकाच दगडावर भगवान नृसिंह व भगवान शिव११ व्या व १२ व्या शतकातील या भगवान विष्णूच्या मूर्तीवरील नक्षीकाम लक्षवेधी आहे. हिस्ट्री विभागातील सर्वाेत्कृष्ट शिल्प म्हणजे एकाच दगडावर दोन शिल्प कोरण्यात आलेली आहेत. पुढील बाजूस भगवान नृसिंह अवतार व पाठीमागील बाजूस भगवान शिव यांचे शिल्प आहेत. यावरील नक्षीकाम पाहून प्रत्येकजण चकित होऊन जाते. भारतीय शिल्पकलेचा सर्वाेत्कृष्ट नमुना म्हणून या शिल्पाकडे बघितले जात आहे.