बापू सोळुंके
औरंगाबाद : सटाणा शिवारातील रेल्वे रुळावर झोपलेल्या त्या कामगारांच्या अंगावरून रेल्वे मालगाडीचे तब्बल ४५ डबे गेल्याने मृतदेहाचे अक्षरश: बारीकबारीक तुकडे झाले. सुमारे २०० मीटरपर्यंत (७०० फूट) रेल्वेने हे मृतदेह फरपटत नेले. या अंतरात रेल्वे रुळावर रक्तामांसाचा सडा पडला होता. १६ जणांच्या शरीराचा चेंदामेंदा होऊन डोक्याची शकले होऊन, हात-पाय आणि अन्य अवयव घटनास्थळी छिन्नविछिन्न अवस्थेत विखुरले होते. रक्त आणि मांसाचे तुकडे रूळ आणि खडीला चिकटले होते.
कामगारांचे मृतदेह ट्रकमध्ये, तर छिन्नविच्छिन्न अवयव पिशवीत !अपघातानंतरचे भीषण वास्तव पाहून भोवळ येईल, असेच दृश्य होते. पोलिसांनी रुळावरील मृतदेह उचलून एका ट्रकमध्ये ठेवले. त्यावर कडुलिंबाचा पाला टाकून ते झाकले. विखुरलेले लहान-मोठे अवयव आणि मांसाचे तुकडे प्लास्टिक पिशवीत जमा केले. हे काम करणाºया पोलिसांचे हातमोजे आणि बूट रक्ताने माखले होते.
जिल्हाधिकारी उदय चौधरी व पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सकाळी ९.३० वाजता अपघात विभागात भेट दिली. अपघातातून बचावलेल्या विरेंद्रसिंह व इंद्रलाल यांना धीर दिला. त्यांना चहा-नाश्त्ता देवून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. सर्व मृतदेह शवविच्छेदनगृहात हलवण्यात आले. ते मृतदेह वाहनातून खाली घेईपर्यंत दोन्ही अधिकारी येथे उपस्थित होते. ते जाताच ११ वाजेच्या सुमारास रोहयोमंत्री संदीपान भुमरे, आमदार अंबादास दानवे, नारायण कानकाटे यांनी बचावलेल्या वीरेंद्रसिंह कडून घडना समजून घेतली व धीर दिला. तर खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे यांनीही शवविच्छेदनगृहाला भेट दिली. मध्यप्रदेशातून मंत्री येत आहेत. समन्वयासाठी मदत करू, असे त्यांनी सांगितले. दुपारी एक वाजेपर्यंत ओळख पटवण्याचे काम पोलीस, रेल्वे पोलीस करीत होते. मध्यप्रदेशचे पथक घाटीत आले. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या व्याख्यान कक्षात अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर पथक जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना झाले. डॉ. कैलास झिने, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. रमेश वासनिक यांनी अतिरिक्त कर्मचाºयांच्या मदतीने सायंकाळी ५ वाजेपर्यंत शवविच्छेदन केले. मृतदेहात फार्मिलीन रसायन सोडल्याने मृतदेह 24 तास कुजत नाही. शरीररचना विभागप्रमुख डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. लईक व डॉ. प्रतिमा कुलकर्णी यांंच्या पथकाने एम्बाल्बिंग प्रक्रिया केल्याचे डॉ. झिने म्हणाले.चालून चालून थकलो म्हणून थांबलो !चालून चालून आम्ही थकलो होतो. पाणी पिलो आणि म्हटलं थोडा वेळ आराम करावा. त्याचदरम्यान रेल्वे रुळाच्या बाजूला असतानाच थोडी धुंदी आली आणि डोळा लागला. त्यानंतर समोरून कधी ट्रेन आली ते समजलेच नाही आणि माझ्या सहकाºयांना चिरडून टाकले. त्या क्षणी काकाने मला लोटले म्हणून मी बचावलो. माझ्या पायाला थोडा मार लागला. ट्रेन आल्याचे आम्हाला समजले नाही. आमचा डोळा लागला होता. आम्ही १९ जण होतो. सर्व मजूर मध्यप्रदेशातीलच पण वेगवेगळ्या जिल्ह्यातील होते. - इंद्रलाल दुर्वे, बचावलेला मजूर
औरंगाबादेतून गावासाठी वाहन मिळेल अशी आशा होतीआम्ही काका आणि पुतणे या अपघातातून वाचलो. माझ्या पुतण्याचे वय १९ वर्षे असून, माझे वय २१ वर्षे आहे. आम्ही जानेवारीत जालन्याला आलो होतो. आई, बायको आणि दोन छोटी छोटी मुलं घरी एकटीच आहेत, म्हणून तिकडे जायचे होते. औरंगाबादवरून बस किंवा ट्रक मिळेल, या उद्देशाने आम्ही आलो. काल संध्याकाळी ४ ते ५ दरम्यान आम्ही जालन्याहून निघालो. काही ठिकाणी मध्ये थांबून एक एक चपाती खाल्ली आणि इतर चपात्या पुढच्या प्रवासासाठी ठेवल्या; परंतु काळानेच आमच्यावर घाला घातला. -सज्जनसिंग दुर्वे, जखमी मजूर
आम्ही पाससाठी अर्ज केला; पण मिळाला नाहीजालन्यात कंपनीच्या मालकाला गावी जाण्यासाठी पासची विनंती केली होती. त्यांनी पास मिळत नसल्याचे सांगितले. कंपनी सुरू झाल्याने काम सुरू करा नाही तर गावी जायचे असले तर जा, असे सांगितले. उमरिया जिल्ह्यात जाण्यासाठी पास मिळावा म्हणून आठवडाभर प्रयत्न करीत होतो. अर्ज स्वीकारण्यात आला नव्हता. त्यामुळे जालन्याहून रूळांतून पायी निघालो. थोडा थकलो, त्यामुळे मागे पडल्याने रेल्वे पटरीच्या बाजूला बसलो, तिथे झोप लागली. ट्रेनचा आवाज आल्याने उठलो. मी ओरडत पळालो मात्र, तोपर्यंत रेल्वे त्यांना चिरडून गेली. -वीरेंद्रसिंग गौर, बचावलेला मजूर
पाय दुखत असल्याने मागे पडलो आणि वाचलोमी आणि माझ्या गावातील सुरेंद्रसिंग आम्ही यांच्या सोबत निघालो होतो. मात्र, पाय दुखत अलल्याने मागे पडलो. एका ठिकाणी थांबलो. तिथे डोळा लागला; पण मी रेल्वे रुळाच्या खाली होतो. सुरेंद्र पुढे गेला होता. तो पटरीवर होता. रेल्वे आली त्यावेळी मी जागा झालो. बाजूला सरकलो. रेल्वे पुढे निघून गेली. मात्र, सर्वांना तिने चिरडले होते. गावाकडे माहिती कळली आहे. फोनवर फोन येत आहेत. घरी सर्व चिंतित होेते. त्यात फोन डिस्चार्ज झाला. रेल्वे पोलिसांना माहिती देऊन वैतागलो. या मृतदेहांची ओळख पटवणेही गरजेचे आहे. त्यात काय करावे कळेनासे झाले आहे. -शिवमानसिंग गौर, बचावलेला मजूर