छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने आपल्या १६ नागरी सुविधा शुक्रवारपासून ऑनलाईन केल्या. स्मार्ट नागरिक ॲप, मनपाच्या वेबसाईटवर जाऊन या सुविधांचा लाभ नागरिकांना घरबसल्या घेता येईल. या सुविधांसह सिद्धार्थ उद्यानात बच्चे कंपनीसाठी बसविलेल्या ई-ट्रेन, संगीत कारंजाचे लोकार्पण पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले.
सिद्धार्थ उद्यानात आयोजित कार्यक्रमास खा. इम्तियाज जलील, आ. प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, प्रदीप दादा, रफत यारखान, मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांची उपस्थिती होती. नागरिकांना अत्यंत छोट्या-छोट्या कामांसाठी महापालिका कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. मालमत्ता हस्तांतरण, बेबाकी प्रमाणपत्र, पाणी जोडणीचे हस्तांतरण, वृक्षाच्या फाद्यांची छाटणी, वृक्षतोड परवाना, झोन प्रमाणपत्र, प्राणी परवाना-नूतनीकरण, नर्सिंग होम नोंदणी-नूतनीकरण, वैद्यकीय कचरा विल्हेवाट सदस्यत्व, एमटीपी नोंदणी, विवाह नाेंदणी, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र नागरिकांना घरी बसून काढता येतील. या सेवांचे लोकार्पण पालकमंत्री भुमरे यांच्या हस्ते झाले.
चार वर्षांपासून सिद्धार्थ उद्यानातील मिनी ट्रेन बंद होती. जुनी ट्रेन बंद करून ई-ट्रेन आणली. त्याचे लोकार्पण उपस्थित मान्यवरांनी ट्रेनमध्ये बसून केले. संगीत कारंजाचे लोकार्पणही पार पडले. मनपा शाळांमधील विद्यार्थी-शिक्षक हजेरीसाठी स्मार्ट गुरू ॲप तयार करण्यात आले. या ॲपचे लोकार्पणही पार पडले. प्रास्ताविक शहर अभियंता ए. बी. देशमुख यांनी केले. अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी कल्याणकारी सेवांची माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त अपर्णा थेटे, सोमनाथ जाधव, नंदा गायकवाड, दक्षता कक्ष प्रमुख एम. बी. काझी, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांची उपस्थिती होती. मनपातील निवृत्त २९ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.