औरंगाबाद : शहर आणि परिसरात डेंग्यू आणि डेंग्यूसदृश आजारांनी हातपाय पसरवले आहेत. शहरात सप्टेंबर महिन्याच्या १६ दिवसांत डेंग्यूचे १६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्या तुलनेत ग्रामीण भागात केवळ एकच रुग्ण आढळला. खाजगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहर डेंग्यूचा उद्रेक होण्याच्या उबंरठ्यावर आहे.
डेंग्यूसदृश आजाराने शहरात एक, तर सिल्लोड तालुक्यातील वडाळा येथे दोन दिवसांत तिघांचा मृत्यू झाल्याने महापालिका आणि आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. जुलै आणि आॅगस्ट या गेल्या दोन महिन्यांत डेंग्यूचे १६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये शहरात १४ रुग्ण आढळून आले, तर केवळ २ रुग्ण ग्रामीण भागातील होते. हे दोन रुग्णही जुलै महिन्यात आढळले. आॅगस्ट महिन्यात ग्रामीण भागात एकही डेंग्यूचा रुग्ण आढळून आलेला नाही. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचा फैलाव अधिक झपाट्याने होत असल्याचे दिसते. या महिन्यात शहरात आतापर्यंत ४१ डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले. यामध्ये १६ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. ग्रामीण भागात ५ संशयित रुग्णांपैकी एकाला डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
शहरात कोरडा दिवस, औषध, धूरफवारणीसह विविध उपाय राबविण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे; परंतु शहरात आढळून येणाऱ्या डेंग्यूच्या रुग्णांमुळे हा दावा फोल ठरत आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरातच ‘डेंग्यू’चा विळखा अधिक दिसून येत आहे. डेंग्यूचे रुग्ण असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जागे झालेल्या मनपाच्या आरोग्य पथकाने सातारा-देवळाई, रोजाबाग येथे धूरफवारणी, औषध फवारणी, संशयित रुग्ण तपासणी सुरू केली. घाटी रुग्णालयात दररोज ८ ते १० रुग्ण दाखल होत आहेत, तर खाजगी रुग्णालयांची ओपीडी तापेने फणफणाऱ्या रुग्णांनी भरून जात आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºयांची संख्या पाहता डेंग्यूसदृश रुग्णांचा आकडा कितीतरी अधिक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
तीन ते चार दिवस ताप, तर डेंग्यूची शक्यतातीन-चार वर्षांपूर्वी डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला होता. त्या तुलनेत सध्या फार गंभीर परिस्थिती नाही; परंतु डेंग्यू, डेंग्यूसदृश रुग्ण येत आहेत. चार ते पाच दिवस ताप असेल तर डेंग्यूची तपासणी केली जाते.- डॉ. सागर कुलकर्णी, सचिव, औरंगाबाद बालरोगतज्ज्ञ संघटना
प्लेटलेट्सची मागणी वाढलीडेंग्यू झालेल्या रुग्णाच्या शरीरात रक्तातील प्लेटलेट्स कमी होऊन अंतर्गत रक्तस्राव होतो. परिस्थिती गंभीर झाल्यास मृत्यूही ओढवतो. त्यामुळे रुग्णाचे आयुष्य वाचवण्यासाठी त्याला तातडीने प्लेटलेट्स पुरवून प्लेटलेट्सची कमरता भरून काढली जाते. सध्या प्लेटलेट्सची मागणी वाढली आहे, असे विभागीय रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे यांनी सांगितले.
खबरदारी आणि आहार महत्त्वाचाडास उत्पत्ती होणार नाही, याची नागरिकांनीही काळजी घेतली पाहिजे. घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी झाकून साठवणे, पाण्याचे भांडे एक दिवस कोरडे करणे आदी महत्त्वाचे आहे. तसेच आजारपणात अधिकाधिक पाणी पिणे, समतोल आहार घेणे आणि बाहेरचे खाद्यपदार्थ टाळणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
७ हजार ठिकाणी डासअळ्याजिल्ह्यात तब्बल ७ हजार ५०२ ठिकाणी डासअळी आढळून आल्या. यामध्ये ९६७ घरांतील पाणीसाठा रिकामी करणे अशक्य होता. अशा ठिकाणी अॅबेट टाकून डासअळ्या नष्ट करण्यात आल्या, तर ६ हजार ५३५ भांड्यांतील पाणी रिकामे करून डासअळ्या नष्ट करण्यात आल्या.
या भागात आढळले रुग्णशहरात बारूदनगर नाला, जुनाबाजार, उस्मानपुरा, हर्षनगर, आरेफ कॉलनी, मिल कॉर्नर, नवजीवन कॉलनी, घाटी परिसर, जयभीमनगर, खडकेश्वर, गारखेडा, बेगमपुरा या भागांत एकूण १६, तर वैजापूर तालुक्यात एक डेंग्यूचा रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयातर्फे देण्यात आली.
सिल्लोडमध्ये पथक रवानालोकांनी पाण्याची भांडी आठवड्यातून एकदा कोरडी केली पाहिजेत. घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. डासांपासून संरक्षण होईल, याची काळजी घेतली पाहिजे. सिल्लोड येथील वडाळा येथे २० जणांचे पथक पाठविण्यात आले आहे.- डॉ. विनायक भटकर, सहायक संचालक (हिवताप)
उद्रेक नाहीशहरात डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णाचा अहवाल आलेला नाही. वर्षभरात याच कालावधीत डेंग्यूचे रुग्ण वाढत असतात. ज्या भागात रुग्ण आढळत आहेत, तेथे सर्वेक्षण केले जात आहे.- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
दररोज ८ ते १० रुग्णघाटी रुग्णालयात डेंग्यूसदृश, मलेरिया, न्यूमोनिया, वायरल फिव्हरचे रुग्ण दाखल होत आहेत. साधा डेंग्यू, डेंग्यू शॉक सिंड्रोम आणि डेंग्यू हेमोरेजिक असे डेंग्यूचे तीन प्रकार आढळतात.- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख, मेडिसिन विभाग, घाटी