पैठण : नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील धरणांतून बुधवारी रात्री पाण्याचा विसर्ग वाढल्याने धरणाकडे जवळपास २५ हजार क्युसेक क्षमतेने पाणी गोदावरी व प्रवरेतून जायकवाडीच्या दिशेने झेपावले आहे. मात्र, जायकवाडी धरण शंंभर टक्के भरलेले असल्याने धरणाचे १६ दरवाजे बुधवारी रात्री अर्ध्या फुटाने उघड्यात आले. धरणाची चार दरवाजे १६, २१, १४, २३ अर्धा फूट वाढवून एकूण दोन फूट सहा इंच उघडून २०९६ क्यूसेक विसर्ग सांडव्याच्या वक्राकार द्वारातून नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तर सांडव्याची १०, २७,१२, २५, ११, २६, १३, २४, १५, २२, १७, २० ही १२ दरवाजे दोन फूट उंचीने उघडून ३५६३२ व जलविद्युतकेंद्रामधून १५८९ क्यूसेक असा एकूण ३७२२१ क्यूसेक इतका विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे. यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत असून, गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी धरणातून आणखी विसर्ग वाढवावा लागेल, असे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला असून, तेथील धरण समूहातून विसर्ग सुरू करण्यात आल्याने जायकवाडी धरणात बुधवारी १० हजार क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती, तर धरणाचे १६ दरवाजे, जलविद्युत प्रकल्प व दोन्ही कालव्यांतून ११५७३ क्युसेक असा विसर्ग करण्यात येत आहे. वरील धरण समूहातून आज मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आले. या धरणातील पाणी जायकवाडीकडे झेपावले असून, जायकवाडी शंभर टक्के भरलेले असल्याने येणाऱ्या पाण्याला जागा तयार करण्यासाठी आज जायकवाडी धरणातून विसर्ग करण्यात आला असल्याचे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता काळे यांनी सांगितले.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून ८९८५ क्युसेक, गंगापूर ११४२ क्युसेक, पालखेड २६२५ क्युसेक, कडवा ३३८४ क्युसेक, असा विसर्ग करण्यात आला हे सर्व पाणी नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात येते. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात ६३१० क्युसेक विसर्ग आज करण्यात आला. याचप्रमाणे नगर जिल्ह्यातील निळवंडे २०१६ क्युसेक, ओझर वेअर २३४७ क्युसेक, मुळा धरणातून ३००० असा विसर्ग आज करण्यात आला हे पाणी प्रवरेच्या पात्रातून जायकवाडीकडे झेपावले आहे. प्रवरा व गोदावरी नदीद्वारे जायकवाडीत १८ हजार क्युसेक आवक होणार असल्याने आज तातडीने जायकवाडीचे १६ दरवाजे वर उचलून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला.