पैठण : हवामान खात्याने २९ आॅक्टोबरपर्यंत ‘हाय अलर्ट’चा इशारा दिल्याने जायकवाडी प्रशासनाची धांदल उडाली आहे. संभाव्य पाण्याची आवक लक्षात घेता काठोकाठ भरलेल्या धरणात पाण्यासाठी जागा निर्माण करण्याकरिता शुक्रवारी जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे तीन फुटांनी वर उचलून सांडव्यातून ५१ हजार ८९३ क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, स्थानिक पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणात २० हजार क्युसेक एवढी आवक सुरू आहे. आवक लक्षात घेता धरणातून होणारा विसर्ग आणखी वाढविण्यात येऊ शकतो, अशी शक्यता जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली.शुक्रवारी दिवसभर ४३ हजार क्युसेक क्षमतेने धरणातून गोदावरी पात्रात विसर्ग सुरू होता. सायंकाळी ५ वाजेदरम्यान पुन्हा विसर्ग वाढवून तो ५१ हजार क्युसेक करण्यात आला. मोठ्या क्षमतेने विसर्ग होत असल्याने गोदावरी नदीला पूर आला असून, धरणाखालील पिंपळेश्वर पूल पूर्ण पाण्याखाली गेल्याने पैठण, दक्षिण जायकवाडी व कावसानची वाहतूक शुक्रवारी बंद पडली.
गेल्या चार दिवसांपासून धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने जलद गतीने धरणात पाणी जमा होत आहे. दरम्यान, २९ आॅक्टोबरपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टी होईल, असा इशारा जायकवाडी प्रशासनाला कळविला आहे. त्यामुळे १०० टक्के भरलेल्या धरणात पाण्यासाठी रिकामी जागा तयार करावी लागत असल्याचे अभियंता काळे यांनी सांगितले.शुक्रवारी सायंकाळी धरणाचे १०, २७, १६, २१, १४, २३, १२, २५ व ११, २६, १३, २४, १५, २२, १७, २० हे १६ दरवाजे तीन फुटांनी वर उचलून गोदापात्रात ५० हजार ३०४ क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून १५८९ क्युसेक, असा मिळून ५१ हजार ८९३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दरम्यान, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून येणारी आवक नगण्य असल्याचे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे व संदीप राठोड यांनी सांगितले.
धरणात जागा तयार केली नाही, तर...जायकवाडी धरण काठोकाठ भरलेले आहे. या परिस्थितीत स्थानिक पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाला, तर धरणात जलदगतीने पाणी जमा होईल. येणाऱ्या पाण्याला धरणात (पॉकेट) जागा केली नाही, तर जेवढी आवक होईल, तेवढाच विसर्ग करावा लागतो. अशा परिस्थितीत विसर्गावर नियंत्रण ठेवता येत नाही व पूरपरिस्थिती ओढावू शकते. यामुळे धरणात अगोदरच ‘पॉकेट’ तयार करून ठेवल्यास येणाऱ्या पाण्याला थोपवून नियंत्रित विसर्ग करता येतो, असे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.