- बापू सोळुंके
औरंगाबाद : वयाची चाळिशी ओलांडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची प्रशासनातर्फे नुकतीच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी झालेल्या १ हजार ३०० कर्मचा-यांपैकी २१० पोलिसांना (१६ टक्के) मधुमेह आणि रक्तदाब असल्याचे समोर आले. कामाचा वाढता ताण, सकस आहाराकडे दुर्लक्ष आणि व्यायामाच्या अभावामुळे कर्मचाºयांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे.
औद्योगिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या औरंगाबाद शहराच्या सुरक्षेसाठी पावणेचार हजार पोलीस कार्यरत आहेत. राज्यातील संवेदनशील शहरांमध्ये औरंगाबादचा समावेश होतो. विविध राजकीय आणि सामाजिक चळवळीचे औरंगाबाद हे प्रमुख केंद्र आहे. देश-विदेशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची येथे सतत ये-जा असते. पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी-कर्मचा-यांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे बंधनकारक आहे. तंदुरुस्त पोलिसांना विशेष भत्ताही प्रशासनाकडून दिला जातो. असे असताना कामाच्या व्यापामुळे पोलिसांना स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष देता येत नाही.
परिणामी त्यांना विविध आजारांची लागण होते. प्रशासनाकडूनही कर्मचा-यांच्या कल्याणासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. त्याअंतर्गत वयाची चाळिशी ओलांडणाºया पोलिसांची दरवर्षी आरोग्य तपासणी केली जाते. शहर पोलीस दलात कार्यरत कर्मचाºयांपैकी १ हजार ५९३ पोलीस कर्मचारी चाळिशी ओलांडलेले आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. अन् कालपर्यंत १ हजार ३०० पोलिसांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यातील २१० पोलिसांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब असल्याचे तपासणीत समोर आले. शिवाय अन्य पोलिसांना कमी दिसणे, त्वचा विकार, पाठीचा त्रास, पोट दुखणे, असे किरकोळ स्वरुपाचे त्रास असल्याचे समोर आले.
पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे म्हणाल्या की, शहर पोलीस दलातील कर्मचा-यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. त्यानुसार यावर्षी १ हजार ५९३ पोलिसांची आरोग्य तपासणी केली जात आहे. यापैकी १ हजार ३०० पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, त्यांच्या वैद्यकीय तपासणीचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.
योगशिक्षक नियुक्तएक वर्षापूर्वी शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाºयांना योग आणि प्राणायाम शिकविण्यासाठी शासनाने योगशिक्षकाची नियुक्ती केली आहे.हे योगशिक्षक पोलिसांसाठी नियमित शिबीर घेतात. मात्र या योगशिक्षकाने आतापर्यंत किती पोलिसांना योग आणि प्राणायामाचे धडे दिले, याबाबतची माहिती समजू शकली नाही. योगशिक्षकाच्या मानधनासाठी स्वतंत्र निधी शासनाने उपलब्ध केला आहे.