औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णालयातील खाटा रुग्णांनी भरत आहेत. त्यामुळे खाटा उपलब्ध नसल्याच्या कारणामुळे कोणत्याही रुग्णाची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरातील एका औषध व्यावसायिकाने मनपाला १६ खोल्यांचा बंगला उपलब्ध करून दिला आहे.
हरिश्चंद्र मित्तल असे या व्यावसायिकाचे नाव आहे. कोरोनामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. त्यामुळे हरिश्चंद्र मित्तल यांनी स्वत:च्या मालकीचे शांतिनिकेतन कॉलनीतील १६ खोल्यांचे घर तात्पुरत्या स्वरूपात मनपाला मोफत देण्यासाठी पुढाकार घेतला. या जागेत ५० ते ६० रुग्णांची व्यवस्था करण्याचा प्रयत्नही केला आहे. वीज, पंखे, पाणी आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांसाठी जागा कमी पडू नये, म्हणून अनेक ठिकाणी रेल्वेच्या बोगींचे रूपांतर रुग्णालयात करण्यात आले आहे. औरंगाबादेत खाटा नसल्याच्या कारणावरून कोणाचीही गैरसोय होऊ नये, यासाठी घराचे रूपांतर तात्पुरत्या स्वरूपात कोविड रुग्णालयात करण्यासाठी वडिलांनी पुढाकार घेतला, असे निखिल मित्तल यांनी सांगितले.
मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या, क्वारंटाईनसाठी जागेची मदत होऊ शकेल. खाजगी डॉक्टरांनी जबाबदारी घेतली तर मोठी मदत होईल.