छत्रपती संभाजीनगर : वडिल सुरक्षारक्षक असून, दारूचे प्रचंड व्यसन आहे. दोन मुलींच्या सांभाळण्याचा भार आईवरच होता. त्यामुळे आईनेच १६ वर्षांच्या मुलीचे लग्न २६ वर्षाच्या मुलासोबत जमवले. या अल्पवयीन मुलीच्या विवाहाची माहिती पोलिसांना कळाली. त्यावरून दामिनी पथकाने घटनास्थळ गाठत नवरा-नवरीच्या आई-वडिलांना समजावून सांगत बालविवाह रोखला. ही घटना उस्मानपुऱ्यातील मिनाताई ठाकरे सभागृहात रविवारी दुपारी घडल्याची माहिती भरोसा सेलच्या निरीक्षक अम्रपाली तायडे यांनी दिली.
भरोसा सेलच्या निरीक्षक तायडे यांना उस्मानपुऱ्यात बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक अनिता फासाटे, भरोसाच्या उपनिरीक्षक ज्योती गात यांना सहकाऱ्यांसह खात्री करण्यासाठी पाठविले. दामिनी पथकाने साध्या वेशात घटनास्थळ गाठत लग्न होणार कन्फर्म केले. सभागृहात नवरदेव होता. अडीच वाजेच्या सुमारास नवरी आली. तेव्हा पथकाने नवरीच्या वयाचा पुरावा नातेवाईकांकडे मागितला. तेव्हा नवरीची जन्मतारीख ३० मार्च २००७ निघाली. नवरीला नुकतेच १६ वर्ष पूर्ण झाले होते. नवरा मुलाचे वय २६ वर्षांपेक्षा अधिक होते.
दामिनी पथकाने नातेवाईकांना लग्नाचे दुष्परिणाम सांगितले. मुलीचा विवाह केल्यास बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार सर्वांवर गुन्हे दाखल होतील, असे स्पष्ट केले. तेव्हा नातेवाईकांनी चुक झाल्याचे मान्य करीत १८ वर्ष होईपर्यंत मुलीचे लग्न करणार नसल्याचे लेखी लिहुन दिले. घटनेची उस्मानुपरा ठाण्यात नोंद केली. ही कारवाई निरीक्षक अम्रपाली तायडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अनिता फासाटे, ज्योती गात, सहायक फौजदार लता जाधव, हवालदार निर्मला निंभोरे, हिरा चिंचोळकर, आकाश नरवडे, चाईल्ड हेल्पलाईनच्या अन्नपूर्णा ढोरे यांनी केली.
...अन् नवरा रडू लागला
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील नवरा मुलगा होता. तो पुण्यात सुरक्षारक्षक कंपनी सुपरवायझर म्हणून नोकरीला आहे. नवरी अल्पवयीन असल्यामुळे लग्न करता येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नवऱ्या मुलालाच रडू कोसळले. तेव्हा त्याचे नातेवाईकांनी सांत्वन केले.
वऱ्हाडी पोटभर जेऊन गेलेसभामंडपात लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. चार स्वयंपाकींनी २०० लोकांचे जेवणही तयार केले हाेते. विवाह होणार नसल्यामुळे सर्व अन्न वाया जाईल. वऱ्हाडी मंडळीही बीड जिल्ह्यातुन आलेली होती. त्यामुळे पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वऱ्हाडींना जेऊ घालण्यात आले. लग्न न होताच वऱ्हाडी पोटभर जेवण करून गेले.