औरंगाबाद : भोळ्या भाबड्या भाविकांना स्वस्तात हज आणि उमराची यात्रा करून आणण्याचे आमिष दाखवून १६० जणांकडून ५४ लाख रुपये गोळा करून पसार झालेल्या टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाला जिन्सी पोलिसांनी राजस्थानमध्ये पकडले.मीर अली इर्शाद महेमुद अली (४५,रा. प्रियदर्शनी कॉलनी, पडेगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी मीर इर्शाद अली आणि त्याचा भाऊ जाहेद अली यांनी रोशनगेट आणि शहागंज भागात अशील टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीचे कार्यालय थाटले होते. तेथे त्याने स्वस्तात हज आणि उमराची यात्रा करून देतो, अशी जाहिरात केली होती. विशेष म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार त्याने कमीत कमी ४० हजार ते ६० हजार रुपये असे वेगवेगळे दर ठेवले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून १६० जणांनी हज आणि उमराला जाण्यासाठी त्याच्याकडे बुकिंग केले आणि एकूण ५४ लाख रुपये त्याच्याकडे जमा केले. मोठी रक्कम हातात पडल्यानंतर आरोपींनी दोन्ही ठिकाणचे त्याचे कार्यालय बंद केले आणि ते मोबाईल बंद करून गायब झाले. कार्यालय उघडण्याची महिनाभर प्रतीक्षा केल्यानंतर सादीक अली सज्जद अहेमद रजवी (३९,रा. बायपास) यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात ९ जानेवारी रोजी फिर्याद नोंदविली. दोन्ही आरोपी भावांनी मोबाईल बंद करून नातेवाईकांसोबत संपर्क ठेवत नव्हते. मात्र, जिन्सी पोलीस त्यांचा शोध घेत होते. सायबर क्राईम सेलच्या तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपी मीर इर्शाद अली हा राजस्थानमध्ये असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांना मिळाली.पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके, कर्मचारी आर. एन. शेख, हारुण शेख, संपत राठोड, संजय गावंडे, धनंजय पाडळकर, सुनील जाधव आणि नागरे यांच्या पथकाने राजस्थानमधील कोटा गाठले. तेथे आरोपी मीर हा पप्पू बिल्डर नावाच्या व्यक्तीसोबत राहत असल्याचे कळाले. पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवून मीरला पकडले. त्याला घेऊन पोलीस औरंगाबादला आले.म्हणे दर वाढल्याने पळालोपोलिसांनी आरोपी मीरला फसवणुकीविषयी विचारणा केली तेव्हा त्याने गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला की, हज आणि उमरा यात्रेचा खर्च वाढल्याने आम्ही बुकिंग करणाऱ्यांना प्रत्येकी पाच ते सहा हजार रुपये वाढून मागितले. तेव्हा त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आपण पळालो.
१६० हजयात्रेकरूंना ५४ लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला राजस्थानमध्ये पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:13 AM