हिंगोली : एकीकडे देश महासत्ता होण्याच्या मार्गावर असताना दुसरीकडे अन्नापायी होणारे कुपोषण कमी होण्याच्या मार्गावर नाही. कोट्यवधी रूपयांचा खर्च करूनही कुपोषण आटोक्यात येत नाही. जिल्ह्यात १0९0 अंगणवाड्या बालकांसाठी काम करीत असल्या तरी तीव्र कुपोषित बालकांची संख्या १६१४ वर पोहोचली आहे. आहाराचा मेनू बदलला, प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रूग्णालयापर्यंत कुपोषित बालकांसाठी सेवा देत असताना कुपोषणाचा डाग जाण्याच्या मार्गावर नाही.
बहुतांशजण अर्धपोटी किवा उपाशी झोपतात. प्रौढांमध्ये भूकबळी तर बालके कुपोषणाची शिकार होतात. ग्रामीण तसेच दुर्गम भागातच कुपोषणाची समस्या नसून शहरी भागही त्यापासून सुटलेला नाही. प्रामुख्याने प्रथिनेयुक्त आहाराच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवते. शिवाय आहार जरी उत्तम असला तरी तो वेळेवर घेतला नाही तर अन्न जात नाही आणि आजारांमुळेही कुपोषण होत असल्याचे समोर आले आहे. म्हणून बालकांच्या प्रकृतीनुसार कुपोषित बालकांचे वर्गीकरण करण्यात आले. त्यात 'तीव्र कुपोषण' सर्वात घातक आणि वरच्या क्रमांकाचे आहे. जिल्ह्यात अशा बालकांची संख्या १ हजार ६१४ आहे. एकूण बालकांत दीड टक्के बालके कुपोषणाची शिकार बनली आहेत. सेनगाव तालुक्यात सर्वाधिक ४४३ तर औंढा नागनाथ तालुक्यात सर्वात कमी २00 बालकांची नोंद करण्यात आली आहे. कळमनुरी ३१६, वसमत ३0२ आणि हिंगोली तालुक्यात ३0७ कुपोषित आहेत. एखाद्या गावात संख्येने अधिक असणार्या बालकांसाठी 'ग्राम बालविकास केंद्र' उभारण्यात आले आहे. जिल्ह्यातील ६0 केंद्रात एका बालकावर महिन्याला १ हजार रूपयांचा खर्च होतो. प्रामुख्याने आहारावर अधिक लक्ष दिल्या जाते. प्रथिनेयुक्त आहार देऊनही कुपोषण थांबले नसल्यास बालकांना औषधोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवले जाते. उपयुक्त औषधी या बालकांना नियमित दिल्या जातात. प्रत्येक महिन्याला अंगणवाडी सेविकांकडून कुपोषित बालकांचे सर्व्हेक्षण केल्या जाते. तद्नंतर वैद्यकीय अधिकारी तपासणी करून कुपोषण जाहीर करतात. एकीकडे यंत्रणा बालकांना शोधण्याचे कामी करीत असताना दुसरीकडे या समस्येचा नायनाटासाठी सवरेतपरी प्रयत्न केले जात आहेत. पहिल्यापेक्षा ही समस्या बर्याच प्रमाणात कमी झाली असली ती आटोक्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)
■ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही बालकांचे कुपोषण कमी होत नसल्यास त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले जाते. मागील सहा महिन्यांपूर्वी येथे कुपोषित बालकांची व्यवस्था करण्यात आली. तिथे बालरोग विभागाकडून आहारापासून त्यांच्या औषधोपचाराकडे विशेष लक्ष दिल्या जाते. दिवसातून तीनवेळा उपयुक्त आहार देण्याचे काम परिचारिकांकडून होते. तसेच डॉक्टरांकडून औषधौपचारावर लक्ष दिल्या जाते.
■ दुर्गम भाग असलेल्या हिंगोली जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण मोठे आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासकीय पातळीवरून विविध उपाययोजना करण्यात आल्या.