छत्रपती संभाजीनगर : चुना, उडदाची डाळ, उसाचा चिपाडा (चौथा) यासह इ.स. १६५१ ते १६५३ काळात ज्या ज्या साहित्यांचा वापर करण्यात आला, त्याच साहित्यांचा वापर करून ऐतिहासिक सोनेरी महाल पुन्हा एकदा उजळविण्यात येणार आहे. या कामासाठी परिसरात तीन मोठे हौद तयार करण्यात आले आहेत. त्याबरोबर आवश्यक यंत्रसामग्री दाखल झाली असून, जवळपास १५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे काम करण्यात येणार आहे.
वास्तू रचनेचा उत्तम नमुना असलेला सोनेरी महाल इतिहासप्रेमी आणि पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत आला आहे. काळाच्या ओघात ठिकठिकाणी त्याची दुरवस्था झाली आहे. या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्तीच्या कामासाठी ३ कोटी ९३ लाख २३ हजार ८५० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर या कामासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सोनेरी महाल मूळ स्वरूपात आणण्यात येणार आहे. वीज पडून काही ठिकाणी नुकसान झाले आहे. देखभाल-दुरुस्तीसह वाॅटर प्रूफिंगचे काम केले जाणार आहे.
असे आहे सोनेरी महालसोनेरी महालाची वास्तू आयताकृती आणि दुमजली असून, उंच चौथऱ्यावर स्थित आहे. संपूर्ण बांधकाम दगड, विटा आणि चुन्यातील आहे. खालच्या मजल्यावर एक स्तंभबद्ध दालन आणि चार खोल्या आहेत. दुसऱ्या मजल्यावर मध्यभागी एक दालन असून, त्याच्या चार कोपऱ्यात चार खोल्या आहेत. सर्वांत वर टेहाळणीचा मनोरा आहे. इमारतीस संतुलित नक्षीदार कमानी आहेत. मात्र, गेल्या काही वर्षात ठिकठिकाणी पडझड झाली आहे.