हणमंत गायकवाड , लातूरशहरात विनापरवाना रिलायन्स जिओ कंपनीने २५ ते ३० टॉवर उभारले आहेत. यात मनपाचा लाखोंचा महसूल बुडविण्यात आला असून, नगरसेवकांच्या घरांवरही अनधिकृत टॉवर आहेत. याची इनकॅमेरा चौकशी करण्यात आली असली तरी त्याचा अहवाल गुलदस्त्यात आहे. त्यातच आता काँग्रेसच्या गटनेत्याने टॉवर आणि फोरजीला परवानगी देण्यासाठी अन्य पक्षांच्या गटनेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. होकार म्हणून काही गटनेत्यांच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या आहेत. संबंधीत कंपनीला १७ कि.मी.ची परवानगी असताना ३० कि. मी.चे रस्ते खोदून खराब केले आहेत, तरी या कंपनीला अधिकृत करण्याचा घाट काँग्रेसच्या गट नेत्यांकडून घातला जात आहे.लातूर शहरात मोफत वायफाय देण्याचे गाजर रिलायन्स जिओ कंपनीने मनपाला दाखविले आहे. त्यामुळेच अनधिकृत टॉवराच्या चौकीशाचा अहवाल दडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्व क्षेत्रिय अधिकारी तसेच अभियंता आणि चौकशी समितीच्या काही सदस्यांनी कंपनीवर कारवाई करण्यासाठी अहवालात सुचविले असल्याचे समजते. पण हा अहवालच दडविला जात आहे. राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने अहवालाची मागणी केली. पण त्यांना अहवाल दिला नाही. इकडे कंपनीला फोरजी यंत्रणा उभी करण्यासाठी मनपाने १७ कि. मी. अंतराचे रस्ते खोदण्याची परवानगी दिली. पण कंपनीने ३० कि. मी. पर्यंत रस्ते खोदून नियमाचे उल्लंघन केले आहे. रस्ते दुरूस्त करून देण्याची अटही पाळली नाही. यात मनपाच्या रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. कच्चे रस्ते खोदावेत, डांबरी आणि पक्क्या रस्त्यांना हात लावू नये, अशी अट असताना कंपनीने पक्के रस्तेही खोदले आहेत. तरीही मनपा प्रशासन आणि काँग्रेसचे गटनेते कंपनीला अधिकृत करण्याचा घाट घालत आहेत. मोफत वायफायच्या गोंडस नावाखाली कंपनीला अभय देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच चौकशी समितीचा अहवाल दडपण्याचा प्रयत्न होत आहे. रिलायन्स जिओ कंपनीने मोफत वायफाय देण्याचे जसे गाजर दाखविले आहे, तसे अन्य दोन कंपन्यांनी लातूर शहराला मोफत वायफाय देण्याचे मान्य केले आहे. त्यात ओंकार इनफोटेक आणि नेटवर्क सोलूशन या कंपन्यांचा प्रस्ताव मनपाकडे आहे. पण रिलायन्स जिओ कंपनीच्या प्रेमात अधिकारी तसेच गट नेते का पडले आहेत, अशी चर्चा मनपाच्या वर्तुळात जोरदार सुरू आहे. कंपनीने उभारलेले टॉवर अनधिकृत असताना या कंपनीला अभय कशासाठी? काय काळेबेरे करण्यासाठी असा सवाल उपस्थित होत आहे.
‘4ॠ’साठी १७ कि.मी.ची परवानगी; रस्ते खोदले मात्र ३० कि.मी.!
By admin | Published: July 28, 2016 12:34 AM