छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात जखमी १७ जणांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
अपघाताची माहिती मिळताच गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी घाटी रुग्णालयात धाव घेऊन जखमी रुग्णांची विचारपूस केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. बी. लिंगायत, डॉ. विकास राठोड , डॉ. सुरेश हरबडे आदी उपस्थित होते.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रात्री उशिरा वैजापूर येथे दोन वाहनांच्या धडकेत १२ जण ठार झाले आहेत. जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विविध वार्डात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बहुतांश जखमी हे नाशिक येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर जांबरगाव टोलनाक्यासमोर पहाटे दीड वाजता टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करणाऱ्या सुमारे १२ जणांचा मृत्यू झाला.