हतनूर : हतनूरपासून काही अंतरावर असलेल्या टापरगावात एकाच दिवशी तब्बल १७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून एकूण बाधितांची संख्या २३ वर गेली आहे. एकाच वेळी सतरा सतरा जणांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनदेखील हादरले आहे. उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वरकड, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, तालुका वैद्यकीय अधिकारी बाळकृष्ण लांजेवार. मंडळाधिकारी दिनकर पाटील यांनी पाहणी केली.
टापरगावात गेल्या आठवड्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शनिवारी चाळीस संशयित रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली गेली. सोमवारी त्याचा अहवाल प्राप्त होताच तब्बल १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे चार कुटुंबातील १७ जणांना हा कोरोना लागण झाली आहे. नवीन बाधितांच्या संपर्कातील आणखी ३२ जणांची तपासणी करण्यात आली. कोविड सेंटरला न पाठविता या रुग्णांना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. आशा कार्यकर्ता, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली बाधितांवर उपचार सुरू आहेत, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत गावंडे यांनी सांगितले.