प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : औरंगाबाद विभागातील औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्यांत २६ साखर कारखान्यांपैकी १७ कारखान्यांत बॉयलर पेटले आहेत. अन्य नऊ कारखाने बंदच आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ११ कारखाने आहेत. त्यापैकी सहा सहकारी व चार खासगी कारखान्यांचा समावेश आहे. यंदा त्यातील दोन सहकारी व चार खासगी कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत. येथील दैनंदिन गाळप क्षमता १८,७०० मेट्रिक टन एवढी आहे.
जालना जिल्ह्यात पाच साखर कारखान्यांपैकी सर्व कारखान्यांत गाळप हंगाम सुरू आहे. यात तीन सहकारी व दोन खासगी कारखान्यांचा समावेश आहे. येथील दैनंदिन गाळप क्षमता १४ हजार मेट्रिक टन आहे.
बीड जिल्ह्यात ११ साखर कारखाने आहेत. फक्त सहा साखर कारखान्यांत साखर उत्पादन होत आहे. येथील गाळप क्षमता २८ हजार ४५० मेट्रिक टन आहे.
तीन जिल्हे मिळून २६ पैकी १७ कारखान्यांत गळीप हंगाम सुरू आहे; पण नऊ कारखाने बंद आहेत. कारण काही कारखान्यांत गैरव्यवहार झाला आहे, तर काही कारखाने तोट्यात आहेत. काही कारखाने जिथे उसाचे क्षेत्र नाही अशा भागात उघडण्यात आले आहेत. राज्य बँकेने कर्ज वसुलीसाठी अवसायनात काढले आहेत. यंदा उसाचे पीक भरघोस आले आहे. मात्र, परिस्थिती अशी आहे की, कारखाने कमी पडत आहेत. एकमेकांचा ऊस ओढण्यात कारखाने लागले आहेत. राजकीय अड्डा बनलेल्या या कारखाना बंदमुळे त्याचा परिणाम त्या भागातील शेतकऱ्यांवर झाला आहे. ऊस तोडणीसाठी शेतमजुरांना परजिल्ह्यात जावे लागत आहे. सर्व कारखाने सुरू असते तर या भागाचा विकास झाला असता. यंदा साखर उताराही सरासरी ८.०३ टक्के एवढा आहे.
चौकट
गैरव्यवहाराचे बळी
नऊ साखर कारखाने राजकारण व गैरव्यवहारचे बळी ठरले आहेत. शिवाय पक्षीय राजकारणाचा फटकाही कारखाना आणि ऊस उत्पादकांना बसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेते मंडळी आणि शेतकरी ज्याप्रमाणे ऊस उत्पादन, दर आणि राज्य शासनाकडून मदत मिळवून घेण्याबाबत आग्रही आहेत, तसे चित्र मराठवाड्यात नसल्यानेही कारखाने आणि शेतकरी अडचणीत आहेत. शासनाचेही मराठवाड्यातील साखर कारखान्यांकडे लक्ष नसल्याचे चित्र आहे.