औरंगाबाद : जिल्ह्यातील निजामकालीन १७३ शाळांतील वर्गखोल्यांची पुनर्बांधणी व ३०८ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यासाठी १५ कोटी ७८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा विभागांतर्गत शासनाकडे निधीसाठी मागणी केल्याची माहिती शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी दिली.
शालेय शिक्षण व क्रीडा समितीची बैठक गुरुवारी शिक्षण सभापती गलांडे यांच्या दालनात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील शाळांतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यात नववी व बारावीचे ग्रामीण भागातील विद्यार्थी ८० टक्के पेक्षा अधिक उपस्थित राहत असून, नववीच्या विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण पन्नास टक्क्यांच्या जवळपास असल्याचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी सांगितले.
जिल्हा नियोजनातून प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी, नवीन वर्गखोल्यांसाठी १२ कोटी तर माध्यमिक शाळांच्या दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांसाठी ३ कोटींचा नियतव्यय मंजूर असून, त्यासाठी सुरू असलेल्या नियोजनाचा बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यासाठी २१ जानेवारीला स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचे गलांडे यांनी सांगितले. निजामकालीन शाळांच्या पुनर्बांधणी व दुरुस्तीसाठी २०१७-१८ च्या आधारे राज्य शासनाने प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार १७३ शाळांच्या पुनर्बांधणी व ३०८ मंजूर शाळा वर्गखोली दुरुस्तीची मागणी या प्रस्तावाद्वारे राज्य शासनाकडे केली आहे.
---
तालुका - पुनर्बांधणी वर्गखोली संख्या - दुरुस्ती वर्गखोली संख्या
--
औरंगाबाद -३२ -१२७
गंगापूर - १३ः ०६
कन्नड -२० -१३
खुलताबाद -१३ - ४०
पैठण -२१ -३६
फुलंब्री - ०८ः ०४
सिल्लोड -१९- ७२
सोयगाव -१६ - १०
वैजापूर-३१ - ००