उस्मानाबाद : तालुक्यातील १८ गावातील पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १८ कोटी रूपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे़ यात सिंचनाच्या विविध कामांसह प्राचीन जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता दशरथ देवकर यांनी दिली़तालुक्यातील गावे टँकरमुक्त, टंचाईमुक्त करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १६ ते २१ मे या कालावधीत शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते़ या माध्यमातून प्रत्येक गावाला भेटी देवून ग्रामस्थांशी संवाद साधून जलस्त्रोतांची माहिती संकलित करण्यात आली़ याद्वारे तालुक्यातील १२३ गावांना भेटी देण्यात आल्या होत्या़ एक अभियंता, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, संबंधित गावातील सरपंचांसह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता़ गावातील शिवकालिन, निजामकालीन अशा प्राचीन जलस्त्रोतांची माहिती घेऊन त्यांच्या बळकटीच्या आवश्यक त्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत़ तसेच गावाची पाणीपातळी वाढविण्यासाठी सिमेंट बंधारे, पाझर तलावाची पायाभरणी, विहीर पुनर्भरण, समतल चर खोदणे, जमीन सपाटीकरण, नाला खोलीकरण, शेततळे, रिचार्ज शाफ्ट घेणे आदी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत़ ही कामे कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत केली जाणार आहेत़ मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पाणलोट विकास क्षेत्र, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, कृषी विभागाद्वारे निधी उपलब्ध होेणार असून, दिवाळीनंतर उपलब्धतेनुसार व टंचाईच्या तीव्रतेनुसार ही कामे केली जाणार आहेत़ यामुळे संबंधित गावातील टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे़ (वार्ताहर)
३९ गावांसाठी १८ कोटींचा आराखडा
By admin | Published: June 16, 2014 12:23 AM