पैठण : धरणात येणारी आवक कमी झाल्याने एक फूटाने वर उचलून विसर्ग सुरू असलेले सहा दरवाजे पुन्हा अर्धाफुटावर करून जायकवाडी धरणाच्या सांडव्यातून होणारा विसर्ग मंगळवारी ३१४४ क्युसेक्सने घटविण्यात आला. धरणात १०७७८ क्युसेक्स अशी आवक होत असून १२८२१ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
सकाळी धरणाचा जलसाठा ९८.४०% होता तो सायंकाळी ९८.२३ ईतका झाला होता.धरणाचा जलसाठ्यात दिवसभरात ०•१७% घट झाल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळी धरणाचे सहा दरवाजे एक फुटाने तर १२ दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून १२५७६ क्युसेक्स विसर्ग सुरू होता. दरम्यान दुपारी १२ ते १ वाजे पर्यंत एक फूटाने सुरू असलेले १०, २७, १९, १८, १६ व २१ हे दरवाजे अर्धाफुटाने कमी करण्यात आले. यामुळे धरणाच्या १८ दरवाजातून अर्धा फुटाने ९४३२ क्युसेक्स विसर्ग गोदावरी पात्रात सुरू होता.
आवक घटली...... धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसा पासून सुरू असलेल्या पावसाने आज विश्रांती घेतली. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा निळवंडे व ओझर वेअर मधून जायकवाडी धरणासाठी होणारे विसर्ग बंद करण्यात आले. मंगळवारी सकाळी ११५८३ क्युसेक्स क्षमतेने नाथसागरात आवक सुरू होती, सायंकाळी आवक १०७७८ पर्यंत घटली होती. जायकवाडी धरणासाठी मुळा ४००० व नांदूर मधमेश्वर ४०३५ क्युसेक्स या दोन धरणातून विसर्ग सुरू आहे.
धरणातून १२८२१ क्युसेक्स विसर्ग..जायवाडी धरणातून एकूण १२८२१ क्युसेक्स विसर्ग मंगळवारी सुरू होता. यात धरणाच्या सांडव्यातून ९४३२, जलविद्युत प्रकल्पातून १५८९, डावा कालवा १२०० व उजवा कालवा ६०० क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे.
पर्यटकांना बंदी...जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आल्याने नाथसागर परिसरात पर्यटकांची गर्दी वाढल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात गर्दी झाल्याने पर्यटकांसाठी जायकवाडीचे रस्ते बंद करण्याचा निर्णय तहसील, पोलीस व जायकवाडी प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. जायकवाडी धरणाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावर पोलिसांनी नाकेबंदी केली असून नागरिकांनी धरणाकडे जाऊ नये असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके, अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे, धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे आदींनी केले आहे.