औरंगाबाद : यंदाच्या पावसाळ्यात बुधवारी सायंकाळी जायकवाडी धरणातून प्रथमच ७६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला. धरणाचे १८ दरवाजे ४ फुटांनी उघडण्यात आले. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. दुपारपर्यंत ६७ हजार क्युसेक पाणी धरणातून नदीपात्रात सोडण्यात येत होते, सायंकाळी जायकवाडी धरणाच्या उर्ध्व (वरच्या) दिशेने येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने सुमारे १० हजार क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला.
२७ जुलै रोजी जायकवाडी धरणात ९१.५७ टक्के पाणीसाठा होता. नाशिकहून १९ हजार ८५ क्युसेक प्रति सेकंद पाण्याची आवक सुरू होती. धरणाच्या १८ दरवाजातून ३० हजार ४३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. ३ ऑगस्ट रोजी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आल्यानंतर ८ ऑगस्ट रोजी पुन्हा धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. धरणाचे १० दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले होते. ११ हजार क्युसेक विसर्ग सुरू केला.
आठवड्यापासून पाणीपातळीत वाढ९ ऑगस्ट रोजी २९ हजार क्युसेक, १० ऑगस्ट रोजी २० हजार क्युसेक, ११ ऑगस्ट रोजी ११ हजार क्युसेक, १२ ऑगस्ट रोजी २१ हजार क्युसेक, १३ ऑगस्ट रोजी ३९ हजार क्युसेक तर १४ ऑगस्ट रोजी २९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू राहिला. १५ ऑगस्ट रोजी धरण ९५ टक्के भरले. धरणातून २९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सायंकाळी ५७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. १७ ऑगस्ट सायंकाळी ७६ हजार क्युसेक प्रति सेकंद वेगाने धरणातून पाणी गोदावरी नदीपात्रात झेपावले. ४३ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.