औरंगाबाद : कोरोनाच्या महाकाय संकटानंतर ११ दिवस जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गणेश मूर्तिंचे शुक्रवारी पहाटे ३ वाजेपर्यत विसर्जन करण्यात आले. सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मिरवणुक मार्गासह गणेश मूर्तिंचे विसर्जन केल्या जाणाऱ्या विहिरी, परिसरातील तलावावर पोलिसांचा विशेष बंदोबस्त लावला होता. गणेश मूर्तीचे पाण्यात विसर्जन करताना युवक आतमध्ये उतरण्याची शक्यता गृहीत धरून हा बंदोबस्त लावला आहे. सकाळी ९ वाजता बंदोबस्ताच्या ठिकाणी दाखल झालेले पोलीस पहाटे ३ वाजता विसर्जन झाल्यानंतरच घरी पोहचले. तब्बल १८ तास पोलीस बंदोबस्तस्थळी उपस्थित होते.
शहर पोलिसातील वरिष्ठ अधिकऱ्यांसह १७६ अधिकारी आणि २ हजार ५४६ कर्मचारी असा तगडा बंदोबस्त विविध ठिकाणी तैनात केला होता. यात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मुख्य विसर्जन मिरवणुक, विसर्जन विहीर, मिरवणूक मार्ग, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी पोलीस तैनात होते. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, अपर्णा गीते, उज्ज्वला वनकर, दीपक गिरहे, यांच्यासह सहायक आयुक्त बंदोबस्तावर देखरेख ठेवत योग्य त्या सूचना करीत होते.
धक्का स्कॉड तत्पर विशेष शाखा १ अधिकारी, १५ कर्मचारी आणि गुन्हे शाखेचे १ अधिकारी, २० कर्मचारी असे सात पथके मिरवणूक पुढे नेण्यासाठी साध्या वेशात तैनात केले होते. त्यामुळे मिरवणुक कोठेही थांबली नाही. वेळेनुसार पुढे सरकत होत्या. योग्य नियोजनामुळे सर्व काही सुरळीतपणे पार पडल्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.
शहराच्या इंट्री पॉइंटवर तपासणी शहराच्या हद्दीवर हर्सूल नाका, जालना नाका, बीड नाका, पैठण रोड नाका, दौलताबाद टी पॉईंट आणि वाळूज नाका येथे वाहतूक शाखेचे ३६ कर्मचारी वाहनांची तपासणी करीत होते.
वॉच टॉवरवरुन देखरेख शहागंज, सिटी चौक, बारभाई ताजिया, जिजामाता चौक एन-९, टीव्ही सेंटर येथे वॉच टॉवरच्या माध्यमातून मिरवणुकीवर निगरानी करण्यात आली.