औरंगाबाद : शहरात शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेली संततधार शनिवारी दुपारपर्यंत सुरू होती. १८ तासांत ३३.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. हिवाळा सुरू झाला; पण अजून बोचरी थंडीही जाणवू लागली नव्हती. त्यात पावसाने हजेरी लावून ऋतुचक्राची घडीच बिघडून टाकली. या पावसाने शहरातील व आसपासच्या परिसरातील रस्त्यांची दैना करून टाकली. रस्त्यांवरील खड्ड्यांचे रूपांतर तळ्यात झाले होते. पाण्यामुळे खोलीच न कळाल्याने अनेक दुचाकी खड्ड्यातआदळल्या. पावसाळा संपून आता हिवाळा सुरू झाला. मात्र, थंडीऐवजी भरदुपारचे ऊन शहरवासीयांचा घाम काढीत होते. मात्र, अचानक शुक्रवारी ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि सायंकाळी ६ च्या मुहूर्तावर संततधार सुरू झाली ते शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जोर कायम होता. शुक्रवारी सायंकाळी ६ ते शनिवारी सकाळी ८.३० वाजेदरम्यान २८.४ मि.मी. व त्यानंतर ११.३० वाजेपर्यंत ५.० मि.मी. या १८ तासांत ३३.४ मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा जोर एकदम कमी झाला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत अवघी ०.५ मि.मी. पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली. यंदा पावसाळ्यात पाऊस कमी पडल्याने आता हिवाळ्यात पाऊस पडणार नाही, असा शहरवासीयांचा अंदाज होता; पण अचानक पावसाने हजेरी लावल्याने कपाटात ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट बाहेर काढावे लागले. सकाळी विद्यार्थीही रेनकोट घालून शाळेत जाताना दिसले. पावसाचा जोर कायम असल्याने सकाळच्या वेळी चाकरमानी रेनकोट, छत्री हातात घेऊनच घराबाहेर पडले होते. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर खूपच मंदावला होता; पण ढगाळ वातावरण कायम होते. परिणामी, दिवसभर शहरवासीयांना सूर्यदर्शन घडले नाही. शहागंज भाजीमंडईत चिखल शहागंज भाजीमंडईत पावसाने सर्वत्र चिखल निर्माण झाला होता. चिखल तुडवत ग्राहकांना भाजी खरेदी करावी लागत होती. आधीच उकिरड्यावर भरणाऱ्या या भाजीमंडईत सडलेल्या भाज्यांच्या ढिगावर पावसाचे पाणी पडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. बाजारात सर्वत्र चिखल त्यावर पोते टाकून भाज्यांची विक्री केली जात होती, अशा गलिच्छ वातावरणात भाजी खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. येथील विक्रेत्याने सांगितले की, दिवसभरात २५ टक्केच भाजीपाला विक्री झाला. शिल्लक माल आता फेकून देण्याची वेळ आली आहे. ताडपत्रीने झाकले धान्य जाधववाडीतील धान्याच्या अडत बाजारात व्यापाऱ्यांनी धान्याचे पोते रस्त्यावर ठेवले होते. एकावर एक धान्याचे पोते रचून ठेवण्यात आले होते. पावसामुळे या धान्याच्या पोत्यावर ताडपत्री टाकण्यात आली. मात्र, पावसाच्या पाण्याने खालचे पोते भिजले.
१८ तासांत ३३.४ मि.मी. पाऊस
By admin | Published: November 16, 2014 12:00 AM