औरंगाबाद : किरकोळ भांडणानंतर धारदार शस्त्र, लाठ्या-काठ्यांनी हाणामारी करणारे, तसेच घरफोड्या आणि लुटमार करणारे १८ गुन्हेगार आता गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत. वारंवार समज देऊनही त्यांचे गुन्हे करण्याचे थांबत नसल्याने या गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी कायदा (मकोका) आणि महाराष्ट्र धोकादायक कृत्ये कायदा (एमपीडीए)अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, शहरातील विविध वसाहती आणि कॉलन्यांमध्ये काही जण हाणामारी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. सामान्यांवर वचक बसविण्यासाठी तलवारीसारखे धारदार शस्त्र घेऊन फिरणे, गोरगरिबांची घरे, प्लॉट बळजबरीने बळकावणे, सशस्त्र हाणामारी करणे आणि चोऱ्या, घरफोड्या, वाहनचोऱ्या करणे हा काही लोकांचा व्यवसायच झाला आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या अठरा सक्रि य गुन्हेगारांची यादी गुन्हे शाखेने तयार केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे म्हणाले की, घरफोडी करणे, वाहनचोरी करणे, लुटमार करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दुसऱ्याच्या घर, प्लॉटवर अतिक्रमण करणे आणि गंभीर दुखापती करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. मात्र, दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेल्या गुन्हेगाराच्या त्रासातून मुक्तता व्हावी, याकरिता मोक्का, एमपीडीएसारखी कारवाई आता त्यांच्यावर केली जाणार आहे. गँग बनवून गुन्हे करणाऱ्यांनाचांगलाचा धडा बसेल,.
जानेवारीपासून सहा गुन्हेगारांविरूद्ध एमपीडीए कारवाईपोलीस आयुक्तांनी जानेवारीपासून ते आजपर्यंत आदिल चाऊस, पवन चावरिया, बाळू पाटोळे, पिंपळे, मतीन शेख आणि भुऱ्या यांच्याविरोधात एमपीडीएची कारवाई केली होती. यापैकी एमआयएमचे नगरसेवक मतीन आणि कुख्यात भुऱ्या यांच्यावरील कारवाईला उच्चस्तरीय समितीने मंजुरी न दिल्याने शासनाने त्यांच्यावरील एमपीडीए रद्द केला होता. शिवाय मोक्कांतर्गत पोलिसांनी कारवाई सुरू केली.
जिन्सी, बायजीपुरा, कटकटगेट परिसरात स्वत:ची टोळी तयार करून खून, खुनाचा प्रयत्न, दंगा करणे, सामान्यांच्या घरावर बळजबरीने अतिक्रमण करणे, लुटमार करून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात शेख इर्शाद शेख इब्राहिम आणि त्याच्या साथीदाराविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली.