छत्रपती संभाजीनगर : महानुभव आश्रमाकडून रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाकडे येताना डाव्या बाजूला सिल्क मिल कॉलनी रोडवरील १८ दुकाने मंगळवारी मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने जमीनदोस्त केली. ही दुकाने पाडण्यात येऊ नयेत म्हणून व्यापाऱ्यांनी मोठा जमाव एकत्र आणला. कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या, त्यातून काहीच साध्य झाले नाही. शेवटी राजकीय दबावाचा वापर करण्यात आल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले.
रेल्वेस्टेशन उड्डाणपूल सुरू होण्यापूर्वी डाव्या बाजूला रस्त्यावर विविध व्यापाऱ्यांनी लोखंडी पत्र्याची दुकाने उभारली होती. मागील काही वर्षांपासून अनेक जण उपजीविका भागवत होते. महापालिकेने मागील सहा महिन्यांत चार वेळेस मालमत्ताधारकांना नोटिसा दिल्या होत्या. मालमत्ताधारकांनी वॉर्ड कार्यालयात जाऊन दोन दिवसांपूर्वी वॉर्ड अधिकारी कैलास जाधव, इमारत निरीक्षकाला धमक्याही दिल्या होत्या. मंगळवारी सकाळी महापालिकेचे पथक कारवाईसाठी दाखल झाले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध सुरू केला. जागेच्या मालकी हक्काबाबत कागदपत्र दाखवा, असे आवाहन करण्यात आले. व्यापाऱ्यांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. मनपाचे पथक कारवाईला पुढे सरसावताच पुन्हा विरोध सुरू झाला. घटनेची माहिती मिळताच प्रभारी अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे अतिरिक्त फौजफाट्यासह दाखल झाले. त्यानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. वेगवेगळ्या व्यवसायाची या ठिकाणी दुकाने होती. दोन हुक्का पार्लरही येथे सुरू असल्याचे नंतर समोर आले. १८ दुकानांमध्ये फास्ट फूड, चायनीज, चहा, वॉशिंग सेंटर चालविले जात होते. या दुकानांमध्ये येणारे ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करत होते. त्यामुळे वाहतुकीला त्रास होत होता, असे वाहुळे यांनी सांगितले.
सातारा-देवळाईत कारवाईचे नियोजनसातारा-देवळाई भागात अनेक मालमत्ताधारकांनी गुंठेवारी केली नाही. त्यामुळे व्यावसायिक आणि निवासी मालमत्ता जमीनदोस्त करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत पन्नास टक्के फी भरून अनधिकृत मालमत्ता गुंठेवारीअंतर्गत नियमित करता येईल. जानेवारीपासून शंभर टक्के फी भरावी लागेल. नागरिकांनी गुंठेवारी योजनेचा लाभ घ्यावा, अन्यथा कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्तांनी नमूद केले.