राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लावण्यासाठी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मदतीचा हात दिला आहे. आतापर्यंत विद्यापीठात वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र आणि विधि विद्याशाखेच्या १८ हजारांपेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासल्या आहेत. ३० पेक्षा अधिक प्राध्यापक प्रतिदिन १७०० ते १८०० उत्तरपत्रिका तपासत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी घेतला होता; मात्र हा निर्णय अंगलट आला आहे. चार महिने झाले तरी बहुतांश अभ्यासक्रमांचे निकाल रखडले आहेत. राज्यापालांनी निकाल जाहीर करण्याची दिलेली डेडलाइन पाळली नसल्यामुळे डॉ. देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. त्याचा प्रभारी पदभार कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. शिंदे यांनी पदभार स्वीकारताच आपले होम पिच असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाकडे उत्तरपत्रिका तपासून देण्याची विनंती केली. या विनंतीला औरंगाबादच्या विद्यापीठाने तात्काळ होकार दर्शवीत उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासण्यात अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या; मात्र सर्व अडचणी दूर करीत विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागात उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली. मागील १५ दिवसांमध्ये १८ हजारांपेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. यास व्यवस्थानशास्त्र विभागाचे संचालक डॉ. वाल्मीक सरवदे यांनी दुजोरा दिला. वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र आणि विधि विद्याशाखेचे ३० पेक्षा अधिक प्राध्यापक आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासत आहेत. प्रतिदिन सरासरी १७०० ते १८०० उत्तरपत्रिका तपासण्यात येत असून, काही वेळा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास मुंबई विद्यापीठाच्या अधिकाºयांची मदत घेण्यात येत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या १८ हजार उत्तरपत्रिका तपासल्या औरंगाबादेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:30 AM