छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध प्रकल्पांसह धाराशिव येथील उपकेंद्रातील इमारतींच्या उभारणीसाठी तब्बल १८४ कोटी ६० लाख ३५ हजार रुपयांचा विकास आराखडाच राज्य मंत्रिमंडळाच्या समोर ठेवला आहे. त्यात विद्यापीठाच्या कोणत्या प्रकल्पांना मंजुरी मिळते, त्याकडे लक्ष लागले आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम अृमत महोत्सवाच्या सांगता वर्षानिमित्त होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यापीठ प्रशासनाने विविध विकासकामांचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामध्ये विद्यापीठातील नामांतर शहीद स्मारकासाठी २ कोटी २४ लाख ४१ हजार रुपयांचा प्रस्ताव मांडला. त्याशिवाय विद्यापीठाच्या सुरक्षा भिंतींसाठी ३३ कोटी ४ लाख ९० हजार, नवीन विद्यार्थी वसतिगृह २० कोटी २९ लाख ५६ हजार, विदेशी विद्यार्थी वसतिगृह १६ कोटी १८ लाख ५ हजार, विद्यापीठातील रस्ते बांधणी १० कोटी ९८ लाख ७३ हजार, स्विमिंग पुलाचे नूतनीकरण ९ कोटी ७६ लाख २२ हजार,
धाराशिव उपकेंद्रातील व्यवस्थापनशास्त्र विभागाची इमारत बांधणे १२ कोटी २९ लाख ३ हजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र विस्तारीकरण ४ कोटी ९९ लाख ९२ हजार, सामाजिकशास्त्र संकुल इमारत बांधकाम २८ कोटी ४६ लाख ३० हजार, आरोग्य केंद्र इमारत २ कोटी ९८ लाख ९७ हजार, उपकेंद्रात ग्रंथालय इमारत बांधकाम १९ कोटी ४० लाख ८४ हजार, वसतिगृहाच्या इमारतींचे विस्तारीकरण १७ कोटी २२ लाख १८ हजार, बंधाऱ्याचे सुशोभीकरण १ कोटी ३७ लाख ६ हजार आणि विविध इमारतींवर सोलार पॉवर प्लांट बसविण्यासाठी ५ कोटी ३४ लाख १८ हजार रुपये, असे एकूण १८४ कोटी ६० लाख ३५ हजार रुपयांचे प्रस्ताव आहेत.
प्रलंबित विकासकामांचे प्रस्ताव सादरविद्यापीठ प्रशासनाने मुख्य परिसर व उपकेंद्रातील प्रलंबित विकासकामांचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यास मंजुरी मिळाल्यास विद्यापीठातील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे.-डॉ. भगवान साखळे, कुलसचिव