औरंगाबाद ः मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमांतर्गत १२७ जलसिंचन योजनांच्या १९ दुरुस्ती कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी १९ कोटी ५७ लाख ६९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील २०९ योजनांच्या ३४ कोटी २८ लाख ७३ हजार रुपयांच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रके सादर करण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंत १२७ योजनांच्या १९ कोटी ५७ लाख ६९ हजार रुपये रकमेच्या दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास शासन स्तरावरून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही सर्व कामे शासन निर्णयानुसार मृद व जलसंधारण विभागाने करण्याबाबत निर्देश दिले आहेत. औरंगाबाद तालुक्यात २५ लाख ६९ हजार रुपयांची २ कामे, फुलंब्री तालुक्यात १८ कामांसाठी ४ कोटी ३ लाख ७६ हजार रुपये, वैजापूर तालुक्यात ५३ कामांसाठी ७ कोटी ४२ लाख ९९ हजार, सिल्लोड तालुक्यात १५ कामे २ कोटी ७२ लाख ८७ हजार, सोयगाव तालुक्यात २४ कामे ३ कोटी ९ लाख २८ हजार, कन्नड तालुक्यात ४ कामांसाठी ८३ लाख ११ हजार रुपये तर पैठण तालुक्यातील ११ कामांसाठी १ कोटी २० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे सिंचन विभागाकडून सांगण्यात आले.