छत्रपती संभाजीनगर : एक जानेवारी २०२२ ते १४ एप्रिल २०२३ दरम्यान जालना जिल्ह्यात एक आणि औरंगाबाद जिल्ह्यात १८ अशा एकूण १९ बिबट्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याचे तसेच बिबट्यांच्या मृत्यूस जबाबदार आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचे आदेश देण्याची विनंती करणाऱ्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.
याचिकेत मुख्य वन संरक्षकांना प्रतिवादी करण्याचे तसेच बिबट्यांच्या मृत्यूसंदर्भात यापूर्वी दाखल झालेल्या जनहित याचिकेसोबत या याचिकेवर एकत्रित सुनावणी घेण्याचेही आदेशात म्हटले आहे. आमीन सुभाष गुडे यांनी ॲड. ईश्वर डी नरोडे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. त्यात २०२२ ते २०२३ या एका वर्षात १९ बिबट्यांचा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. मृत्यूच्या सविस्तर चौकशीचे आदेश देऊन मृत्यूस जबाबदार असलेल्या वन विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाईचे आदेश देण्याची विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने फोटो आणि वर्तमानपत्राच्या बातम्या याचिकेसोबत जोडल्या आहेत. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी.आर. काळे यांनी काम पाहिले.
याचिकेत दर्शविलेला १९ बिबट्यांच्या मृत्यूचा तपशील२३ जानेवारी २०२२ ला सोयगावला विषबाधेने बिबट्याचा मृत्यू झाला होता. १० फेब्रुवारीला औरंगाबाद रेंजमध्ये विहिरीत पडून, २५ फेब्रुवारला गरोदर मादी बिबट्या आणि तिच्या गर्भातील ३ अर्भकांचा अन्नातून विषबाधेने, सिल्लोड रेंजमध्ये झाडावर आढळला मृत बिबट्या, ३० एप्रिलला कन्नड तालुक्यातील हसनखेडा येथे, १० मेला वैजापूर रेंजमध्ये अपघातात मृत्यू, २८ मे ला १० दिवसांच्या बिबट्याचा मृत्यू, २ जूनला औरंगाबाद रेंजमध्ये तापामुळे, ९ जूनला जालना रेंजमध्ये, २८ जुलैला अजिंठा रेंजमध्ये, ४ सप्टेंबरला सावंगीत पकडलेल्या सुदृढ बिबट्याचा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू, २८ जुलैला खुलताबादमध्ये, २३ नोव्हेंबरला वैजापूरला अपघातात, २० फेब्रुवारी २०२३ ला औरंगाबादला, ३ मार्च २३ ला वैजापूरला विहिरीत पडून, ४ सप्टेंबर २३ ला सावंगीत सुदृढ बिबट्याचा आणि १४ एप्रिल २३ ला कन्नडला विहिरीत पडून मृत्यू झाला होता.