लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : शहरातील नामवंत महाविद्यालयाची पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी तिच्या फ्लॅटमध्ये गुपचूप आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्भलिंग निदान चाचणी करीत असल्याचा पर्दाफाश मनपा आरोग्य विभागाच्या पथकाने धाड टाकून केला. ही कारवाई रविवारी दुपारी विजयनगर येथील मल्हार चौकातील देवगिरी रेसिडेन्सीमध्ये करण्यात आली. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात सुरू होती.
महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, विजयनगर येथील देवगिरी रेसिडेन्सी येथील फ्लॅट क्र. ६ मध्ये गुपचूप गर्भलिंग निदान चाचणी केली जाते, अशी माहिती होती. तेव्हापासून आम्ही कारवाईसाठी योग्य वेळेचा शोध घेत होतो. रविवारी सकाळी तेथे दोन गर्भवती महिला गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर लगेच मी स्वत:, तसेच डॉ. अर्चना राणे, डॉ. राठोडकर, डॉ. अमरज्योती शिंदे, मनपाच्या विधि सल्लागार ॲड. स्नेहा शिंदे, कर्मचारी गयासोद्दीन यांच्यासह छापा टाकला. तेव्हा एक महिला तिच्या नातेवाइकासह फ्लॅटमधून बाहेर पडलेली दिसली. यावेळी आम्ही तिला थांबवून संबंधित फ्लॅटमध्ये नेले. तेव्हा तेथे मुख्य संशयित १९ वर्षीय पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी असलेली तरुणी, तिची आई आणि लहान भाऊ असे उपस्थित होते.
गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी वापरले जाणारे टॅब, लॅपटॉप, सोनोग्राफीसाठी वापरले जाणारे स्कॅनर, लोशन, कापूस इ. साहित्य सापडले. हे साहित्या आणि रोख १२ लाख ८० हजार ३०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. टॅबमधील ॲप्लिकेशनद्वारे ही तरुणी गर्भवती महिलांचे गर्भलिंग निदान करीत असे. ती तिच्या लॅपटॉपमध्ये गर्भात मुलगा आहे अथवा मुलगी हे दाखवित असल्याचे स्पष्ट झाले. मनपा पथकाने पंचनामा करून सर्व साहित्य जप्त केले.
चाचणीसाठी दोन मुलींची आई पुण्याहून आली
पुणे येथील रहिवासी असलेली गर्भवती महिला घटनास्थळी होती. तिला पहिल्या दोन मुली आहेत. तिसऱ्यांदा गर्भवती असल्याने पोटातील गर्भात मुलगा आहे अथवा मुलगी; ही तपासणी करण्यासाठी ती तिच्या आतेभावासह देवगिरी रेसिडेन्सी येथे आल्याचे सांगितले. त्यांच्यापूर्वी अन्य एक महिला गर्भलिंग निदान चाचणीसाठी येऊन गेली.
देवगिरी रेसिडेन्सी येथील फ्लॅटमध्ये धाड टाकल्यानंतर पोलिस व महापालिकेच्या आरोग्य विभाागाच्या अधिकाऱ्यांनी गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले.
डॉक्टर मावस भावाकडून घेतले प्रशिक्षण?
विद्यार्थिनीचा मावस भाऊ डॉ. सतीश बाळू सोनवणे यास वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणात जानेवारी महिन्यात पकडले होते. तेव्हापासून तो जेेलमध्ये आहे. डॉ. सोनवणे हा देवगिरी रेसिडेन्सी येथेच राहत होता. शिवाय ही तरुणी बऱ्याचदा जेलमध्ये जाऊन त्याला भेटली आहे. शिवाय त्यांच्यात बराच पत्रव्यवहार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉ. साेनवणे यानेच तिला गर्भलिंग निदान चाचणी कशी करावी, याबाबतचे प्रशिक्षण दिल्याचा संशय डॉ. मंडलेचा यांना आहे.