छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात १० लाख २५,२७४ मीटर पीडी (पर्मनंट डिस्कनेक्ट) करण्यात आले असून, त्यांच्याकडे आतापर्यंत १९०० कोटी रक्कम थकीत आहे. परंतु, ज्यांनी दुसऱ्याच्या नावावर मीटर कनेक्शन घेतले असून, त्याच्याकडून पूर्वीच्या बिलाची वसुली करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी दिली.
जुने थकीत बिल व्याजाशिवाय भरून चालू होणार असल्याने या अभय योजनेत त्याचा फायदा ग्राहकांनी घ्यावा, असे सुचविलेले आहे. संबंधित मालमत्ता कुणाच्या नावावर असून, त्यांनी नवीन मीटर घेतले असेल तर ते पूर्वीचे बिल त्याच्या येणाऱ्या बिलातून कापण्यात येणार आहे. यात शहर विभागात ५१ हजार ७०० पीडी मीटर असून, २७२ कोटी ८ लाख थकीत आहे. अभय योजनेचा जयश्री स्टील इंडस्ट्रीजने पहिला लाभ घेतला आहे.
महावितरणने वीजबिलाच्या थकबाकीसाठी कायमस्वरूपी खंडित केलेल्या वीज ग्राहकांसाठी ‘अभय योजना’ जाहीर केलेली आहे. या अभय योजनेत मराठवाड्यात प्रथम छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक जयश्री स्टील इंडस्ट्रीजचे राजेश प्रकाश सिंगवी यांनी लाभ घेऊन एकरकमी तीन वीज जोडण्यांचे एकूण १,८५,८७५ रुपयांपैकी १,७५,१२० थकीत रक्कम महावितरणकडे भरणा केली. अभय योजनेत १०,७५५ रुपयांचा त्यांना लाभ मिळाला. याप्रसंगी महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी उद्योजकाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मुख्य अभियंता पवनकुमार कच्छोट, प्रभारी महाव्यवस्थापकीय संचालक वित्त व लेखा नितीन पाडस्वान, वरिष्ठ व्यवस्थापक लक्ष्मीकांत राजेल्ली, सहायक अभियंता इरफान खान यांची उपस्थिती होती.