२८२१ कोटींचा पहिला टप्पा : सहा जिल्ह्यांची मदत वाटपात आघाडी
औरंगाबाद : मराठवाड्यात ४७ लाख शेतकऱ्यांचे ३६ लाख ६२ हजार ७८२ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वाटपाला वेग आला आहे. दिवाळीपूर्वीच ६७ टक्के म्हणजेच १९१४ कोटींची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचली आहे.
बुधवारी सायंकाळपर्यंत हे प्रमाण २५०० कोटींच्या आसपास जाईल, असा अंदाज आहे. औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांनी मदत वाटपात आघाडी घेतली आहे. नांदेड आणि उस्मानाबादचा अहवाल विभागीय प्रशासनाला मंगळवारपर्यंत आलेला नव्हता. नांदेड व उस्मानाबाद वगळता सुमारे २५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत पोहोचली आहे.
पहिल्या टप्प्यात ७५ टक्के मदत देण्यात येणार असल्याने महसूल यंत्रणेचे काम चौपट वाढले. शनिवार आणि रविवारी सुटी असतानाही सगळी यंत्रणा ७५ आणि २५ टक्क्यांच्या दोन वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात गुंतली होती. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ या दोन शीर्षकांखाली येणाऱ्या निधींचे वाटप करताना शेतकऱ्यांच्या खातेनिहाय दोन वेगळ्या याद्या कराव्या लागल्या. त्यामुळे मदतीस विलंब झाला.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या १० हजार कोटींच्या पॅकेजमधून विभागाला ३७६२ कोटी रुपयांतील ७५ टक्के म्हणजेच २८२१ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी १० हजार रु. जाहीर केले असून, ७५ टक्क्यांच्या तुलनेत ७५०० रुपये हेक्टरी मिळतील. बागायतीसाठी १५ हजारांच्या तुलनेत ११ हजार २५०, तर फळपिकांसाठी २५ हजार हेक्टरच्या एकूण मदतीपैकी १८ हजार ७५० रुपयांची मदत वाटप सुरू आहे.
एवढ्या कोटींचे वाटप पूर्णऔरंगाबाद जिल्ह्यात ४१६ कोटींपैकी ३२१ वाटप झाले आहेत. जालना जिल्ह्यात ४२५ पैकी ३६६ कोटी, परभणीत २५५ पैकी १३७ कोटी, हिंगोलीत २२२ पैकी १९२ कोटी, नांदेडचा अहवाल अजून आलेला नाही. बीड जिल्ह्यात ५०२ पैकी ३७९ कोटी तर लातूर जिल्ह्यात ३३६ पैकी ३०६ कोटी वाटप झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात २३७ पैकी २१० कोटी वाटप झाले आहेत.