बुधवारी आलेल्या अहवालानुसार पैठण तालुक्यात ४८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. यात ३८ रुग्ण ग्रामीण भागातील असून, पैठण शहरात १० रुग्ण आढळले. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात प्रशासनाकडून पैठण तालुक्यात चांगले काम झाले होते. दुसऱ्या टप्प्यात मात्र हलगर्जीपणा वाढला असून, जनतेने आपापली काळजी घ्यावी असेच प्रशासनास अभिप्रेत असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.
तहसीलदारांना कोरोना, तर मुख्याधिकारी प्रतिनियुक्तीवर
तहसीलदार चंद्रकांत शेळके पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांना प्रतिनियुक्तीवर जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू केल्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांची कमतरता तालुक्यात जाणवत असून, कोरोनासंदर्भात राबवायच्या उपाययोजनांबाबत चालढकल होत आहे.
अनिवासी अधिकारी
कोरोना कालावधीत अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहावे असे आदेश असताना पैठण तालुक्यातील जवळपास सर्वच अधिकारी औरंगाबाद येथून अपडाऊन करीत आहेत. यामुळे कोरोनासंदर्भात बैठका घेणे आणि निघून जाणे असे कामकाज सध्या सुरू आहे. अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने बाकीचे कर्मचारीसुद्धा अपडाऊन करीत आहेत.